अविनाश पवार, पुणे:
Pune Heat Wave News: राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 अंशाच्या पुढे गेल्याचे समोर आले आहे. उन्हाच्या वाढत्या प्रमाणामुळे उष्माघाताचा धोकाही वाढला आहे. अनेक ठिकाणी उष्माताने बळी गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पुणे जिल्ह्यातून अशीच एक दुर्दैवी दुर्घटना समोर आली आहे.
जुन्नरमध्ये उष्माघाताचा बळी
समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात उष्णतेचा वाढता तडाखा आता जीवघेणा ठरत असल्याचं समोर आलं आहे. निमगाव सावा येथिल शेतकरी महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील गावमाळा परिसरातील रुपाली भाऊ गाडगे(वय 40) यांचं सोमवारी सकाळी दुर्दैवी निधन झालं आहे.
रुपाली या मागील दोन दिवस दीवसभर शेतात खुरपणीचे काम करत होत्या. तर आज सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांच्या कुटूंबियांनी त्यांना येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिकच्या तपासण्यासाठी डायग्नोस्टिक सेंटरला जाण्याचा सल्ला देण्यात आला.
तपासणीला जाताना त्यांना चक्कर आली आणि बेशुद्ध पडल्या. त्यानंतर काही वेळेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रूपाली गाडगे यांच्या मागे पती,3 मुले असा परिवार आहे. दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत कष्टाची कामे टाळावीत, पुरेसे पाणी प्यावे आणि स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ, राज्यात 55 रुग्णांची नोंद
राज्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने डीहायड्रेशन सह उष्माघाताचे रुग्ण आढळून येत आहे. राज्यात 1 जानेवारी ते 26 एप्रिल या कालावधीत उष्माघाताच्या 55 रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण मार्च आणि एप्रिल महिन्यात आढळले आहेत. आगामी दिवसात उन्हाची तीव्रता राहणार असल्याने काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे