Dombivli News: डोंबिवली शहरात एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका अनाथ तरुणीला तिच्या मैत्रिणीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केल्यावर, मदतीसाठी धावून आलेल्या मित्रानेच तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोशल मीडियावरील ओळखीचा फायदा घेत मदतीच्या बहाण्याने या नराधमाने तरुणीला निर्जन स्थळी नेऊन तिची अब्रू लुटली आणि मोबाईल घेऊन पसार झाला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अवघ्या 1 तासात बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
पीडित तरुणी डोंबिवलीत राहते आणि एका खासगी ठिकाणी नोकरी करते. ती अनाथ असून तिला आई-वडील नाहीत. काही दिवसांपूर्वी या तरुणीवर एका खोट्या प्रकरणावरून तिच्या मैत्रिणीच्या कुटुंबीयांनी आरोप केले आणि तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मैत्रिणीच्या वडिलांचाही समावेश होता. घाबरलेल्या तरुणीला याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायची होती, पण सोबत कुणीही नव्हते. अशा वेळी तिने स्नॅपचॅट या सोशल मीडिया ॲपवरून ओळख झालेल्या क्रिश भोईर नावाच्या मित्राला मदतीसाठी बोलावून घेतले.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये भररस्त्यात थरार! घरी परतणाऱ्या तरुणाला गाठले आणि बांबूने फोडले; कारण काय? )
मदतीच्या बहाण्याने बलात्कार आणि लूट
आरोपी क्रिश भोईर याने तिला पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याने तिला मानपाडा पोलीस स्टेशनला न नेता एका निर्जन स्थळी नेले. तिथे त्याने पीडित तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता या नराधमाने तिच्या जीपे (GPay) वरून पैसे ट्रान्सफर केले, तिच्या मोबाईलमधील सिम कार्ड काढून घेतले आणि तिचा मोबाईल घेऊन तिथून पळ काढला.
शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत पीडितेची धाव
या भयानक संकटातून सुटल्यावर पीडित तरुणी मदतीसाठी थेट डोंबिवली येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेत पोहोचली. तिथे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना तातडीने पीडितेसोबत पोलीस स्टेशनला पाठवले. शिवसेना पदाधिकारी प्रशांत पाटणे शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हा संघटक किरण मोंडकर, केतकी पवार, पल्लवी इंदुलकर आणि ललिता मेहर या महिला पदाधिकारी जवळपास 8 तास पोलीस स्टेशनमध्ये पीडितेसोबत खंबीरपणे उभ्या होत्या.
( नक्की वाचा : Solapur News: मराठा नवरी सांगून घरात आणली, ती तर निघाली मुस्लीम अन् विवाहित! लग्नानंतर 4 दिवसांत... )
मानपाडा पोलिसांची धडक कारवाई
मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी संपत फडोल आणि त्यांच्या पथकाने घटनेची माहिती मिळताच तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या 1 तासाच्या आत पोलिसांनी शोध घेऊन आरोपी क्रिश भोईर याला ताब्यात घेतले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस अधिकारी प्रियंका सादळकर करत आहेत. क्रिश भोईर याने याआधीही इतर काही मुलींसोबत असे प्रकार केले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलीस आता त्या दिशेने तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world