Maharashtra ZP Election News: राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर 7 फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. या आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून काँग्रेसने नवा डाव टाकला आहे.
आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसची नवी युती
आगामी जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. या निवडणुकांसाठी काँग्रेसने प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन आघाडीसोबत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. ही एक वैचारिक आघाडी असून आगामी जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढू अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या नव्या समिकरणाने भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षाची आघाडी झाली आहे. ही एक वैचारिक आघाडी असून आगामी जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढू असा निर्णय यावेळी घेण्यात आल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ओबीसी बहुजन पक्षाचे नेते प्रकाश आण्णा शेंडगे यांनी त्यांचे सहकारी चंद्रकांत बावकर, जे. टी. तांडेल, पांडुरंग मिरगळ यांनी टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसोबत सविस्तर चर्चा केली.
त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आघाडीची घोषणा केली, ते पुढे म्हणाले की, ओबीसी बहुजन आघाडीने काँग्रेससोबत काम करण्याचा निर्णय घेतला त्याचे मी स्वागत करतो. ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून एका व्यापक भूमिकेतून सामाजिक न्यायासाठी झाली आहे. राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केल्यानंतर मोदी सरकारला त्याचा निर्णय घ्यावा लागला पण अजून ही जातनिहाय जनगणना झालेली नाही. ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी भागिदारी ही काँग्रेसची भूमिका आहे. राहुल गांधी यांच्या या भूमिकेला सर्व समाजातून पाठिंबा मिळत आहे. धनगर, ओबीसी समाजाचे योग्य प्रतिनिधित्व असावे यावर भर दिला जाईल.
भाजप- फडणवीस यांच्यावरील विश्वास उडाला...
भाजपाची सत्ता आल्यावर पहिली सही धनगर समाजाच्या आरक्षणाची करेन असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये २०१४ साली दिले होते पण आजपर्यंत त्याची पूर्तता केलेली नाही. फडणवीस यांनी धनगर, ओबीसी, मराठा, आदिवासी समाजाची आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक केली आहे. जाती जातीत भांडणे लावण्याचे काम त्यांनी केले आहे. या समाजाचा भाजपा व फडणवीस यांच्यावरचा विश्वास उडाला आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
नक्की वाचा - BMC Mayor: मुंबईच्या महापौरपदासाठी शिंदे आग्रही का आहेत? खरं कारण समोर आलं
यावेळी प्रकाश शेंडगे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाचे लचके तोडण्याचे काम केले जात असून २७ टक्के आरक्षणावरही घाला घातला जात आहे. जीआर वर जीआर काढले जात आहेत पण कोणत्याच समाजाला त्याचा फायदा होत नाही. ओबीसी समाजाला न्याय मिळावा यासाठी स्वतंत्र पक्षाची स्थापना करुन समविचारी पक्षाशी आघाडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जातनिहाय जनगणनेची भूमिका घेतल्याबद्दल राहुल गांधी यांचे आम्ही आभार मानतो. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालीच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केला.