जाहिरात

Chandrapur News: महाशिवरात्रीला 2 दुर्दैवी घटना! तीन सख्ख्या बहिणींसह 6 जण बुडाले; जिल्ह्यात हळहळ

दुपारी बारा वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथील प्रकाश मंडल हे आपल्या परिवारातील आठ जणांसह गडचिरोली मार्गावरील व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेले.

Chandrapur News: महाशिवरात्रीला 2 दुर्दैवी घटना! तीन सख्ख्या बहिणींसह 6 जण बुडाले; जिल्ह्यात हळहळ

अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर: राज्यभरात महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जात आहे. महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरे आणि तीर्थस्थळे गर्दीने फुलून गेली आहेत. एकीकडे मंदिरांमध्ये शिवभक्तांनी गर्दी केली असतानाच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन घटनांमध्ये सहा जण बुडाल्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा तसेच वर्धा नदीत या घटना घडल्यात.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  महाशिवरात्रीनिमित्त  परिवारासोबत नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या तीन सख्ख्या बहिणी वैनगंगा नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यापैकी एकीचे प्रेत मिळाले असून, दोघींचा शोध सुरू आहे. आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथील प्रकाश मंडल हे आपल्या परिवारातील आठ जणांसह गडचिरोली मार्गावरील व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेले.

पात्रात उतरल्यावर कविता मंडल, प्रतिमा मंडल आणि लिपिका मंडल या सख्ख्या बहिणी पाण्याचा अंदाज आल्याने खोलात गेल्या. पोहता येत नसल्याने त्या बुडायला लागल्या. तर एक मुलगा आणि महिलाही प्रवाहात लागल्या. आरडाओरड सुरू झाली, मात्र मदतीला कुणीही नव्हते. यातील तो मुलगा आणि महिला पत्रातील खडक हाताला लागल्याने त्याला पकडून राहिले. मात्र तीन बहिणी बेपत्ता झाल्या. यातील कविता मंडल हिचे शव मिळाले असून, दोघींचा शोध सुरू आहे.

( नक्की वाचा : CBSE Exam : दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार, वाचा काय आहे प्रस्ताव? )

अशाच एका दुसऱ्या घटनेत महाशिवरात्रीनिमित्त अंघोळीसाठी गेलेले तीन युवक नदीच्या पात्रात बुडाल्याची  घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली. या तिघांचाही सध्या शोध सुरू आहे. राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील हे युवक असून ते शेजारच्या लोकांसोबत जवळच्या वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेले होते. तुषार शालिक आत्राम (वय 17), मंगेश बंडू चणकापुरे ( वय 20), अनिकेत शंकर कोडापे (वय 18) अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत.

खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच्या काही लोकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य झाले नाही. आता चंद्रपूर येथून बचाव पथक पाठवण्यात आले असून, शोध घेतला जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: