Maharashtra News : प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन (गुटखा) आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली १८ तारखेला मंगळवारी मंत्रालयात बैठक संपन्न झाली. गुटखाबंदीची (Gutkha ban in Maharashtra) अंमलबजावणी कडक करण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी निर्देश दिले असून गुटखाविक्रीच्या सूत्रधारांवर ‘मकोका'अंतर्गत कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
गुटखाबंदी असतानाही परराज्यातून येणारा अवैध गुटखा आणि त्याचे शालेय विद्यार्थी व तरुण पिढीवर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी संबंधीत गुटखा कंपनीच्या मालकांवर आणि या अवेध व्यवसायातील सूत्रधारांवरच ‘मकोका' कायद्यान्वये कारवाई करण्याबाबत गांभीर्याने विचार करावा.
नक्की वाचा - Kalyan News : कल्याणच्या मलंग रस्त्यावरुन जायला घाबरतायेत प्रवासी, रात्रीच्या 'त्या' घटनेने परिसरात खळबळ
राज्यात गुटखा व पान मसालाजन्य पदार्थाची वाहतूक व विक्री होत आहे. त्याला जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकेल का, याबाबत विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठवून मार्गदर्शन घेतले जाणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू - सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
यापुढच्या काळात राज्यात गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी होईल. त्यासाठी या व्यापारातील सूत्रधारांना ‘मकोका' लावून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विचार करण्यात येईल. गुटखाबंदी विरोधात जिल्हास्तरावर विविध विभागांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.