निलेश वाघ
नाशिकच्या मालेगावात सुरू असलेल्या बेकायदेशी कत्तलखान्याचे रक्तमिश्रीत पाणी मोसम नदी पात्रात सोडले जात असल्याने ही नदी रक्तरंजित झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.अनेकदा आवाज उठवून महापालिका प्रशासनाकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. मात्र काल विधी मंडळात भाजपचे विधानपरिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी याबाबत लक्षवेधी मांडल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चे आला आहे.
मालेगावमध्ये वाहणाऱ्या मोसम नदीपात्रात वर्षानुवर्षे रक्त मिश्रित पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पुढे ही नदी गिरणा नदीला जाऊन मिळते. हेच पाणी उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गिरणा धरणात मिळते.या गिरणा धरणावर, मालेगाव , नांदगावसह खानदेशातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत. त्यामुळे लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. वारंवार आवाज उठवून महापालिका प्रशासन याबाबत कुठलीही ठोस कारवाई करीत नसल्याने हा प्रश्न जैसे थे आहे. मात्र भाजपचे विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी विधी मंडळात या प्रश्नावर लक्षवेधी मांडून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले.
नक्की वाचा - Uddhav Thackeray: ठाकरे आले, शिंदे अस्वस्थ झाले! फोटोसेशन वेळी नक्की काय झाले?
मात्र त्यास उत्तर देताना मंत्री उदय सावंत यांनी मोसम नदी पात्रात रक्त मिश्रित पाणी येत नसल्याचा सांगितले. तर मोसम नदीचा राज्य नदी संवर्धन योजनेत सामावेश करून त्यासाठी 10 कोटी 52 लाख रुपयांचा निधी दिल्याचे खुलासा केला.असे अवैध कत्तलखाने सुरू असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश गृह विभागाला दिल्याचे स्पष्ट केले. एकीकडे महापालिका प्रशासन व शासन मोसम नदीत रक्त मिश्रित पाणी येत नसल्याचा दावा करीत असले तरी सत्य काय ते NDTV मराठीने तपासून पाहिले. त्यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रक्त मिश्रित पाणी मोसम नदीत सोडले जात असल्याचे आढळून आले. मालेगाव सामाजिक कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे आंदोलने केले. मात्र त्याचा काहीही परिणाम महापालिका प्रशासनानावर झाला नाही.
मालेगावत अधिकृत एकच कत्तलखाना आहे. मात्र मालेगावात दररोज सर्व नियम धाब्यावर बसवून उघड्यावर शेकडो जनावरांची अवैध कत्तल केली जाते. मालेगाव शहरात रोज शेकडो जनावरांची कत्तल केली जाते. हजारो टन जनावरांचे मांस बाहेरगावी तसेच बाहेर देशात एक्स्पोर्ट केले जाते. कत्तल केलेल्या जनावरांचे रक्त आणि मासाचे तुकडे गटारातून कुठलीही प्रक्रिया न करता मोसम नदी पात्रात सोडले जात आहे. ही वस्तुस्थिती आहे. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना विचारणा केली असता सर्व उपायुक्त व अधिकाऱ्यांनी एकमेकांवर टोलवा टोलवी केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपायुक्तांनीही काही सांगितले नाही.
महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी मात्र याबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. महापालिका व पोलिस प्रशासनाने मास व्यावसायिकांची संयुक्त बैठक घेऊन महापालिकेच्या अधिकृत कत्तलखान्यात जनावरांची कत्तल करण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले. उघड्यावर कत्तल रोखण्याचे पोलिसांचे काम असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. दोन महिन्यात मालेगाव महापालिकेचा वॉटर ट्रिटमेंट प्लांट सुरू होईल. त्यानंतर नदीत रक्त मिश्रित पाणी येणार नाही असे ही त्यांनी स्पष्ट केले. मात्र हे आता कधी पर्यंत प्रत्यक्षात येते ते पाहावे लागणार आहे.