सुनिल दवंगे, शिर्डी
वाढदिवसाची पार्टी दिली नाही म्हणून तरुणाने मित्राची बाईक जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. किरकोळ कारणावरून मित्रांमधील वाद चिघळत गेला आणि अखेर तरुणाने संतापाच्या भरात हे कृत्य केले. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील वेळापुर येथे घडली आहे. या प्रकारामुळे गावात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी प्रकाश बाळासाहेब गायकवाड यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी ते गावातील समाजमंदिराजवळ मित्रांसोबत गप्पा मारत बसले असताना सुनिल म्हसु जगधने हा दारूच्या नशेत तेथे आला. “तू मला वाढदिवसाची पार्टी का दिली नाहीस?” असा सवाल करत त्याने प्रकाश गायकवाड यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
(नक्की वाचा- सरकारी कार्यालयातील भंगार विकून सरकार मालामाल! 7 'वंदे भारत' ट्रेन खरेदी करता येतील एवढी कमाई)
वाद वाढताच त्याने फिर्यादीला चापटी मारली आणि हातातील दगडाने त्यांच्या डाव्या हातावर मारहाण केली. यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास जगधने पुन्हा प्रकाश गायकवाड यांच्या घरी आला. त्याने त्यांच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत घराचा दरवाजा लाथांनी ठोठावला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून बाटलीतील रासायनिक द्रव पदार्थ घरासमोर उभी असलेल्या स्प्लेंडर मोटारसायकलवर ओतून आग लावली.
काही क्षणांत मोटारसायकल जळून खाक झाली. आरोपीने घटनेनंतर घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर वेळापुर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोपरगाव पोलिसांनी आरोपी सुनिल म्हसु जगधने याच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.