शरद सातपुते, सांगली
सेल्फी काढण्याच्या नादात तरुणाचा नदीपात्रात पडून मृत्यू झाला आहे. सांगतील कृष्णा नदी पात्रात ही घटना घडली आहे. रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मोईन गौसपाक मोमीन असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मोईन रविवारी सकाळी मैत्रिणीसोबत कृष्णा नदीकाठावर गेला होता. जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने कृष्णा नदी तुडूंब भरली आहे. नदीतील बंधार्यावरून सांगलीवाडीच्या बाजूने तो मैत्रिणीसह चालत येत होता. मोबाईलवर सेल्फी घेताना मोईनचा तोल गेला आणि तो नदीपात्रात पडला. मोईन हा पट्टीचा पोहणारा होता. तरीही पाण्याचा वेग अधिक असल्याने तो पाण्यासोबत वाहून गेला.
(नक्की वाचा- Mumbai Rains : मुसळधार पावसाचा इशारा, त्यात भरती... मुंबईकरांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे)
त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणीने आरडाओरडा केला. काहींनी बंधार्याकडे धाव घेतली. तोपर्यंत मोईन दूरवर गेला होता. मैत्रिणीने मोईनच्या घरी जाऊन घडलेला प्रकार सांगितला. नातेवाईकांनी नदीकाठावर धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. आयुष्य हेल्पलाईन टीम, स्पेशल रेस्क्यु फोर्स, महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनाही पाचरण करण्यात आलं. बोटीतून मोईनचा शोध घेतला. पण रविवारी सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. आज देखील शोधकार्य सुरु आहे.
(नक्की वाचा - कोकणात मुसळधार! राजापूर शहराला पुराचा वेढा, सिंधुदुर्गातही पावसाची जोरदार बॅटींग)
महिनाभरापूर्वीच झाला होता साखरपुडा
मोइनचा एक महिन्यापूर्वी साखरपुडा झाला होता. ऑक्टोबर महिन्यात त्याचा विवाह होणार होता. त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. मोईन मोमीन हा बॉक्सर प्रशिक्षक आहे. तो आई-वडीलासह हनुमाननगरमध्ये राहतो. मोईनच्या अशा मृत्यूने कुटुंबाला धक्का बसला आहे, तर परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.