Hingoli Crime News : "तू माझी जिंदगी बरबाद केली"; तरुणीची घरात घुसून हत्या, आरोपी अटकेत

Hingoli Crime News : मयत तरुणी संजना खिल्लारी ही कुटुंबात एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर या हत्येच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

समाधान कांबळे, हिंगोली

हिंगोलीत घरात घुसून तरुणीची हत्या करण्यात आली आहे. नातेवाईक असलेल्या तरुणानेच हत्या केल्याचं उघड झालं आहे. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील तरुणी संजना खिल्लारी ही घराच्या दुसऱ्या मजल्यावर वाचन करत बसली होती. त्यावेळी आरोपी अभिषेक खील्लारी हा तीच्या घरी गेला आणि संजना कुठे आहे अशी विचारणा केली.  दरम्यान तिच्या कुटुंबीयांनी संजना वरच्या मजल्यावर आहे असे सांगितले. 

(नक्की वाचा- Shirdi News : कुणी निवृत्त PSI तर कुणी फाड-फाड इंग्रजी बोलतंय; शिर्डीत 80 भिकाऱ्यांची धरपकड)

त्यानंतर अभिषेक थेट वरच्या मजल्यावर गेला आणि "तू माझी बदनामी का केली, तू माझी जिंदगी बरबाद केली", असं म्हणत संजनावर चाकूने वार केला. अभिषेकने आधी संजनाच्या छातीजवळ वार केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे संजना घाबरली आणि तिने गॅलरीमध्ये येऊन आरडाओरड केला. मात्र तोपर्यंत अभिषेक याने तिच्या कमरेजवळ दुसरा वार केला. 

दरम्यान संजनाचा आवाज आल्यामुळे तिचे कुटुंबीय वरच्या मजल्यावर धावले. मात्र तोपर्यंत अभिषेक पळून गेला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संजनाला तिच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Advertisement

(नक्की वाचा-  केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणाला मारहाण; गज्या मारणे टोळीतील तिघांना अटक)

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गोरेगाव पोलिसांनी आरोपी अभिषेक यास सकाळच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. मयत तरुणी संजना खिल्लारी ही कुटुंबात एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर या हत्येच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Topics mentioned in this article