'मणिपूरचा प्राधान्याने विचार केला पाहिजे', सरसंघचालक मोहन भागवतांनी व्यक्त केली चिंता

सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले की, "आपले विचार वेगळे असू शकतात, आपल्या पद्धती वेगळ्या असू शकतात. पण या देशाला आपले मानून त्यासह भक्तिपूर्ण संबंध प्रस्थापित करावे लागतील. या देशाची सर्व मुले आपले बांधव आहेत, हे जाणून घेऊन व्यवहार करावा लागेल".

Advertisement
Read Time: 2 mins

RSS Chief Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS)सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी (10 जून) संघाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित विविध विषयांवर आपले परखड मत व्यक्त केले. सरसंघचालक भागवत म्हणाले की, "हजारो वर्षांपासून आपण जो अन्याय केला आहे, तो मिटवावा लागेल. काही स्वार्थी लोकांनी अस्पृश्यता पसरवली, ती गोष्ट आपल्याला सुधारावी लागेल. प्रत्येकजण काम करतो, पण काम करताना वेळ - मर्यादेचे पालनही केले पाहिजे. कामामुळे कोणालाही त्रास होता कामा नये."

(नक्की वाचा: 'संसदेत विरोधी नाही, प्रतिपक्ष म्हणा'; सरसंघचालक मोहन भागवतांचं आवाहन)

आरएसएस प्रशिक्षणार्थींच्या मेळाव्याला संबोधित करताना सरसंघचालक भागवत म्हणाले की,"देवाने सर्वांची निर्मिती केली आहे. भगवंताने निर्माण केलेल्या या विश्वाप्रती आपल्या भावना काय असाव्यात? याचा विचार करावा लागेल. काळाच्या प्रवाहात जी विकृती निर्माण झाली आहे, ती दूर करावी लागेल. मते भिन्न असू शकतात, पद्धती वेगळ्या असू शकतात, पण या देशाला आपले मानून,त्यासह भक्तिपूर्ण संबंध स्थापित करून, या देशाची सर्व मुलं आपले बांधव आहेत, हे जाणून घेऊन व्यवहार करावा लागेल.

मणिपूरबाबत काय म्हणाले सरसंघचालक?

वर्षभरानंतरही मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित न झाल्याने सरसंघचालक मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की,"संघर्ष सुरू असलेल्या ईशान्येकडील राज्यांतील परिस्थितीचा प्राधान्याने विचार केला पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी आणि समाजात संघर्ष होणे चांगले नव्हे."  

(नक्की वाचा : Nagpur Hit And Run Case: सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित केला सवाल, म्हणाले...)

देशासमोरील समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचीही गरज त्यांनी यावेळेस व्यक्त केली. सरसंघचालक भागवत म्हणाले की, "मणिपूर गेल्या वर्षभरापासून शांतता प्रस्थापित होण्याची प्रतीक्षा करत आहे. राज्यात अचानक हिंसाचार वाढला आहे. मणिपूरमधील परिस्थितीचा प्राधान्याने विचार करावा लागेल. निवडणुकीतील भाषणबाजीतून बाहेर येऊन देशासमोरील समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे".

दरम्यान, गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. या घटनेत आतापर्यंत सुमारे 200 लोकांचा बळी गेला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात झालेल्या जाळपोळीच्या घटनेमध्ये हजारो लोक बेघर झाले आहेत.

(नक्की वाचा: Modi 3.O : मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात कुणाला मिळालं कोणतं मंत्रिपद? एका क्लिकवर पाहा संपूर्ण खातेवाटप)

Photo Credit: ANI

 Mohan Bhagwat | गेल्या एका वर्षापासून मणिपूर शांततेच्या प्रतीक्षेत, मोहन भागवत यांचं वक्तव्य चर्चेत

Topics mentioned in this article