लक्ष्मण सोळुंके, जालना
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचं घोषित केलं आहे. मित्रपक्षांची कोणतीही यादी न आल्याने हा निर्णय घेतल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.
काल दिवसभर मतदारसंघनिहाय चर्चा झाली. मित्र पक्षांची पहाटे 3 वाजेपर्यंत यादीच आलीच नाही. आपले कुणीच नाही त्यामुळे कुणालाच समर्थन द्यायचं नाही, असं ठरवलं आहे. एका जातीवर निवडणूक लढवणं कसं शक्य आहे. मी राजकारणात नवीन आहे. एका जातीवर या राज्यात कोणीच निवडणूक जिंकू शकत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- 'क्लिन बोल्ड डिपॉझिट गुल' पहिल्याच सभेत मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी)
सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. ह्याला पाड त्याला पाड ही भूमिका आपली नाही. उमेदवार पाडण्याची माझी इच्छा नाही. मात्र भूमिकेशी सहमत नसलेल्या उमेदवारांना पाडणार असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.
माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. महाविकास आघाडी आणि महायुती मी कोणाच्याही दबावाला घाबरत नाही. यादीच नाही तर मी तरी काय करणार. मी माझी भूमिका बदलत नाही, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- पालघरमध्ये चाललंय काय? एका मागोमाग नेते का होत आहेत गायब?)
राजकीय भूमिका घेण्याचा प्रयत्न अयशस्वी- प्रवीण दरेकर
मराठा समाजाचं आंदोलन बाजूला ठेवून राजकीय भूमिका घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. मुस्लीम आणि दलित समाजाला सोबत घेऊन राजकीय समीकरण जुळतंय का हे तपासण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र दलित आणि मुस्लीम समाजाने त्यांना प्रतिसाद दिलेला नाही. जातीवर निवडणूक लढवणे आणि जिंकणे सोपं नसतं हे त्यांनी मान्य केलं. देशात असं कधीच झालं नाही. सर्वच समाज एकत्र नांदत असतात. आज मराठा-ओबीसी समाज समोरासमोर उभे करण्याचा प्रयत्न झाला, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली.
या आंदोलनाच्या मागचा बोलवता धनी कुणीतरी आहे. आता त्यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. अंतिम निष्कर्षापर्यंत आताच येता येणार नाही. मात्र पुन्हा पाडापाडी त्यांच्या मनात आलं तर ते भूमिका बदलू शकतात. जर त्यांनी पाडापाडीचं धोरण अवलंबवलं तर त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असं देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.