लक्ष्मण सोळुंके, जालना
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसह इतर मागण्यासाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे आंदोलन करत आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याची माहिती समोर येत आहे. आरोग्य पथकाकडून मनोज जरांगे यांची तपासणी करण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांच्यावर रात्री सलाईनद्वारे उपचार करण्यात आले आहेत. काल रात्री जरांगे यांची तब्येत अत्यंत खालावली होती. मात्र तरीही जरांगे यांनी उपचाराकरिता नकार दिला होता. मात्र मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांना मला उद्यापर्यंत वेळ द्या व आता एक सलाईन घ्या अशी विनंती केली. त्यामुळे शंभुराज देसाई यांच्या विनंतीवरून रात्री 1 वाजून 55 मिनिटाला मनोज जरांगे यांच्यावर सलाईनद्वारे उपचार करण्यात आले आहेत. मनोज जरांगे यांची तब्येत खालावत असल्यानं अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांनीही मोठी गर्दी केली.
(नक्की वाचा: जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मविआ घेणार बाहेरची मदत, बैठकीत नेमकं काय ठरलं?)
बीड, धाराशिव बंदची हाक
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज 21 सप्टेंबर रोजी बीड आणि धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड आणि धाराशिव जिल्हा बंदची हाक दिली गेली.
(नक्की वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपदावरून वाद चव्हाट्यावर, थेट शरद पवारांची मध्यस्थी)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ केली जावी. हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅझेट लागू करावे. अंतरवाली सराटीसह राज्यात मराठा आंदोलनाच्या निमित्ताने दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जावे. यासह इतर मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे. याच उपोषणाला बीड आणि धाराशिवमधून खंबीर पाठिंबा मिळत आहे.