विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी दिवाळीनंतर निवडणुका घेण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे महायुतीबरोबरच महाविकास आघाडीतील जागा वाटप लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही गटातील तिन्ही पक्षांकडून जास्त जागांची मागणी केली जात आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही (Vidhan Sabha Election) जागा वाटपाचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीने चौथ्या 'व्यक्ती'ला पाचारण करण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीत ज्या जागांवर तिढा आहे, त्यावर निर्णय घेण्यासाठी एका खासगी एजन्सीची नेमणूक केल्याचं समजते. त्यांच्यामार्फत महाविकास आघाडीचा तिढा सोडवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महाविकास आघाडीचे विधानसभेसाठीच्या जवळपास 80 टक्के जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाली असून विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. 120 ते 130 जागांवर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सहमती झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तिढा असलेल्या जागांवर दुसऱ्या टप्प्यात चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या अधिकांश जागा त्याच पक्षाला जागा वाटपात देण्यात आल्या आहेत. याशिवाय जिंकलेल्या जागांमध्ये दहा ते वीस टक्के बदल केला जाणार आहे.
नक्की वाचा - Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक स्थागित!
पहिल्या बैठकीत मुंबई-कोकण आणि त्यानंतर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या विभागातील विधानसभा मतदारसंघातील जागांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा पार पडली. तिढा असलेल्या जागांवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून एक एजन्सी नेमून कोणत्या पक्षाची जास्त ताकद आहे हे जाणून अंतिम निर्णय शेवटच्या टप्प्यात घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. विदर्भातील विधानसभा जागांवर पुढील बैठकीत चर्चा होऊन त्या संदर्भात सुद्धा लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. लवकरात लवकर जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world