सौरभ वाघमारे, सोलापूर
मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन सुरु असलेल्या राजकारणाबाबत मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरुन मनोज जरांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही खडसावलं आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने जर या प्रकरणी राजकारण बंद केले नाही तर आम्हाला हा मुद्दा हाती घ्यावा लागेल, असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यामुळे देशभरातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहेत. या प्रकरणी कोणीही राजकारण करू नका. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वापर राजकारणासाठी करू नये. शेवटी हा राज्यातील जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. नेत्यांना खूप जागा आहेत राजकारण करायला. सत्ताधारी असो किंवा विरोधक असो या प्रकरणी राजकारण करू नये, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.
(नक्की वाचा - शिवरायांच्या पायावर डोकं ठेवत मी माफी मागतो : PM नरेंद्र मोदी)
दोषींना कायमचं जेलमध्ये टाका
सर्वांनी राजकारण बंद करा अन्यथा जनतेला तुमच्या विरोधात उठाव करावा लागेल. महाविकास आघाडी आणि महायुतीने जर या प्रकरणी राजकारण बंद केले नाही तर आम्हाला हा मुद्दा हाती घ्यावा लागेल. या प्रकरणात कोणी दोषी असेल तर त्याला कायमचं जेलमध्ये टाकलं पाहिजे. टेंडर घेणाऱ्या लोकांना कशात काय खावं ते कळत नाही. हे टेंडरवाले लोक महापुरुषांचे पुतळे असतील, मंदिर असतील यात पण खातात, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा - 'माफ कर आई, मी तुझी हत्या केली' लेकानं आईचा खून केला अन्...)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण झालं होतं. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी देखील याबाबत माफी मागितली आहे. याबाबत बोलताना मनोज जरांगे यांनी म्हटलं की, यात उद्घाटन करण्याचा काय दोष आहे, घटना तर घडली आहे. त्यामुळे माफी मागितली काय आणी नाही मागितली काय, मात्र आमची मानहानी व्हायची ती झाली आहे. यातील संबंधित दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. मालवण येथील पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारने गडबड केली हे खरं आहे. मात्र असे परत होऊ नये यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी, अशी मागणीही जरांगे यांनी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world