'राजकीय पोळी भाजू नका, नाहीतर तोंड भाजेल'; जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावले

Devendra Fadnavis on Manoj Jarange Patil Morcha : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राजकारण करणाऱ्या विरोधकांना ठणकावलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे.
मुंबई:

Devendra Fadnavis on Manoj Jarange Patil Morcha : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून 'सगेसोयऱ्यां'सह सरसकट आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेला मराठा आरक्षण मोर्चा अखेर मुंबईत दाखल झाला आहे. हे सर्व आंदोलक आझाद मैदानावर पोहोचले असून, जरांगे पाटील यांनी "गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही" असा निर्धार व्यक्त केला आहे. जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात उपोषण सुरू केल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी विरोधी पक्ष याबाबत राजकारण करत असल्याचा आरोप केला. 

सरकारची भूमिका सकारात्मक

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "सरकारची भूमिका पहिल्यापासूनच सकारात्मक आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना आम्ही नेहमीच सहकार्य करत आहोत. मुंबई पोलिसांच्या मदतीने सर्व आंदोलकांना मदत केली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व गोष्टी नियमानुसार होत आहेत."

फडणवीस यांनी यावेळी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं. "काही तुरळक घटनांमध्ये आंदोलकांनी रास्ता रोको केला, पण पोलिसांनी चर्चा केल्यानंतर त्यांनी तो लगेच मोकळा केला. मात्र, काही लोक जाणीवपूर्वक आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मी सर्व आंदोलकांना आवाहन करतो की, कुणीही 'गैरलोकशाही' पद्धतीने वागू नये, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

( नक्की वाचा : Maratha Reservation : 'मराठा आरक्षण कुणाचंही कमी करून देणार नाही'; उपमुख्यमंत्री शिंदेंचं मोठं वक्तव्य )
 

विरोधी पक्षांना ठणकावलं

राज्यातील काही राजकीय पक्षांवरही फडणवीसांनी यावेळी निशाणा साधला. "समाजात वाद निर्माण करून काही लोक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्यांनी हे थांबवलं नाही, तर त्यांचं 'तोंड भाजेल'. ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू आहे, पण आम्ही असं होऊ देणार नाही."

Advertisement

या संवेदनशील मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकांसमोर उभे राहणार नाहीत. आम्हाला ओबीसी समाजालाही सांभाळावं लागेल आणि मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल. गेल्या 10 वर्षांत आमच्या सरकारनेच मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे. इतर कोणत्याही सरकारमध्ये ते झालेलं नाही."

कायदेशीर मार्गाने तोडगा काढणार

या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारने मंत्रिमंडळाची उपसमिती तयार केली आहे. "केवळ आश्वासनं देऊन चालणार नाही, आम्हाला कायदेशीर मार्ग काढावे लागतील. या प्रश्नावर आम्ही प्रयत्नपूर्वक तोडगा काढू. 'प्यादे लढवणे' किंवा 'लोकांना एकमेकांसमोर झुंजवणे' हे आमच्या सरकारचं धोरण नाही," असं फडणवीस म्हणाले.

Advertisement

फडणवीस यांनी शेवटी सर्व पक्षांना ठाम भूमिका घेण्याचं आवाहन केलं. "मराठा आरक्षणावर सोयीची भूमिका घेऊ नका. राजकीय फायद्यासाठी समाजाला भडकवू नका. जनतेची दिशाभूल करणं थांबवा."