लक्ष्मण सोळुंके, बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य सरकार दिखाऊपणा करत असून चिल्लर माणसांना सांभाळून आपली प्रतिमा खराब करून घेत आहे, असा घणाघात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच बीडचा मोर्चा संपल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढा आणि देशमुखांच्या लेकीला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्या असं आवाहनही त्यांनी मराठा बांधवांना केले आहे. बीडमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
'हा जनतेच्या वतीने काढलेला मोर्चा आहे, ही देशमुखांच्या लेकीची हाक आहे. सगळ्या मराठ्यांना आवाहन आहे की, कामे बाजूला सारुन मोर्चात सहभागी व्हा, मिळेल त्या वाहनाने बीडला या. सरकारला या मोर्चाने जाग येईल नाही आली तर आम्ही आणू कुणाचंही बाप येऊ द्या मॅटर दबू देणार नाही, असं म्हणत संतोष देखमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी हलगर्जीपणा करू नये. जातीयवाद पसरेल असं यात काही करू नका,' असे आवाहन मनोज जरांगे पाटील असं म्हणालेत.
'या हत्येचा निषेध करण्यासाठी उद्यापासून जिल्ह्या-जिल्ह्यात मोर्चे काढा, तारीख ठरवा, सगळ्यांनी आपापल्या जिल्ह्यात मोर्चाची तयारी करा. भाजपच्या सगळ्या आमदार, खासदार, मंत्र्यांनी या मोर्चात सहभागी व्हायला हवे. नेत्यांनी तर सगळ्यांनी सहभागी व्हायला हवे, पण तुम्ही काहीच करत नाही. यांनी जर आरोपींना पकडलं नाही तर मराठे तपास हातात घेणार..' असा इशाराही मनोज जरागेंनी यावेळी दिला.
दरम्यान, 'देवेंद्र फडणवीस साहेब आरोपी लपवून ठेऊन तुम्ही तुमच्या इमानदार कार्यकर्त्याच्या कामाचे हे फळ देणार का,? असा सवाल उपस्थित करत आरएसएसने यात लक्ष द्यायला हवे, सरकार जाणून बुजून यात लक्ष देत नाही. असं आम्हाला वाटायला लागल्यानंतर आम्ही मग यांची जिरवू,' असा हल्लाबोलही मनोज जरांगे यांनी केला आहे.