ड्रोन प्रकरणानंतर मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; वाहन ताफ्याच्या सुरक्षेसाठी सशस्त्र पोलीस नियुक्त

Manoj Jarange Patil Security : वाहन ताफा सुरक्षेसाठी एक अधिक तीन सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins

अंतरवली सराटी ड्रोन टेहाळणी प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. विधीमंडळात मंत्री शंभुराज देसाई यांनी ही माहिती दिली आहे. ड्रोन टेहाळणी प्रकरणानंतर मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारने सुरक्षा पुरवण्याचा देखील निर्णय घेतला आहे.

मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरक्षेसाठी एक अधिक एक सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या वाहन ताफा सुरक्षेसाठी एक अधिक तीन सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात ड्रोनद्वारे सर्वेक्षण होत असल्याचे समजताच स्थानिक पोलीस पथक आंतरवाली येथे गेले. तेथील शिवारात पाहणी केली असता पोलीस पथकास ड्रोन आढळून आले नाहीत. मात्र, याबाबत संशयास्पद वाटणाऱ्या बाबींची चौकशी करण्यासाठी तीन स्वतंत्र पथके पोलीस अधीक्षकांनी तयार केली असून चौकशी सुरू आहे, अशी माहिती मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

(नक्की वाचा- लाडकी बहीणीची फरफट, अर्ज भरताना ना-ना अडचणी)

मंगळवारी 3 जुलै रोजी विधानसभेतील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आंतरवाली सराटी येथे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यासंदर्भात सविस्तर अहवाल जिल्हा पोलीस प्रशासनाकडून प्राप्त करून त्याबाबत सभागृहास अवगत करण्यात येईल, असे मंत्री शंभुराज देसाई यांनी सभागृहास आश्वस्त केले होते.

Advertisement

Topics mentioned in this article