विशाल पुजारी, प्रतिनिधी
Maharani Tararani: स्वराज्याच्या इतिहासात आपल्या पराक्रमाने औरंगजेबाला जेरीस आणणाऱ्या महाराणी ताराराणी यांच्याबद्दल एका जैन मुनींनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ऐतिहासिक तथ्यांच्या पलीकडे जाऊन केलेल्या या वक्तव्याचे सामाजिक आणि राजकीय स्तरावर तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
आचार्य नयन पद्मसागर नक्की काय म्हणाले?
मुंबईतील जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात आचार्य नयन पद्मसागर यांनी इतिहासातील विविध दाखले दिले. यावेळी त्यांनी मोहम्मद घोरी आणि मेवाडच्या राणीचा उल्लेख केला. मात्र, चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्या काळातील उल्लेख.
औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले, त्यावेळी त्याला रोखण्यासाठी आणखी एका जैन महाराणीचा जन्म झाला आणि त्या म्हणजे ताराराणी, असे वक्तव्य आचार्यांनी केले. संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हातात तलवार घेणे हाच धर्म असल्याचे सांगताना त्यांनी ताराराणींना थेट जैन समुदायाशी जोडले.
( नक्की वाचा : छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून पेटाऱ्यातून निसटलेच नाहीत? विश्वास पाटील यांचा खळबळजनक दावा,सादर केले पुरावे )
इतिहासातील नेमकी वस्तुस्थिती काय
ऐतिहासिक पुराव्यांकडे पाहिल्यास, महाराणी ताराराणी या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी तब्बल 25 वर्षे औरंगजेबाशी लढा दिला आणि मराठा साम्राज्याचे रक्षण केले. कोल्हापूरच्या गादीची स्थापना करणाऱ्या ताराराणींचा इतिहास महाराष्ट्रातील घराघरात माहिती असताना, त्यांच्या कुळाबाबत अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे इतिहासकारांना मान्य नाही.
इतिहास अभ्यासकांचे प्रत्युत्तर
आचार्य नयन पद्मसागर यांच्या या विधानावर प्रसिद्ध इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी कडक शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. महाराणी ताराराणी या कोणत्या कुळातील होत्या, हे महाराष्ट्राला नव्याने सांगण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. एखादी महापराक्रमी व्यक्ती आपल्या कुळातील असावी असे वाटणे गैर नाही, मात्र इतिहास माहित नसताना अशा प्रकारचे विधान करणे चुकीचे असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. जैन मुनींनी इतिहास बदनाम करणाऱ्यांच्या षडयंत्रात सहभागी होऊ नये आणि शांतताप्रिय जैन समाजाने महापुरुषांच्या नावावरून वाद निर्माण करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world