Marathwada Rain : मराठवाड्यातील भीषण वास्तव, मुसळधार पावसात अंत्ययात्रा, गावात मृतदेहाला अग्नी देणं अशक्य

पाण्यासाठी वणवण करावी लागणाऱ्या मराठवाड्याला पावसाने झोडपून काढलं आहे. आता तर मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठं करावं असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Beed News : मराठवाड्यातील पाऊस (Marathwada Heavy Rain) अद्यापही कायम आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. घर, जनावरांसह शेतातील मातीही अक्षरश: वाहून गेली आहे. गावच्या गावं उद्ध्वस्त झाली आहे. दरम्यान मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील एक भीषण वास्तव समोर आलं आहे. 

बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने मोठी दैना झाली आहे. बीडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान पिंपळादेवी गावात एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. वृद्धेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावात कुठेही जागा शिल्लक नव्हती. त्यामुळे नागरिकांना नेमकं काय करावं हे कळत नव्हतं. 

शेवटी वृद्धेच्या नातेवाईकांना शेजारील लिंबारुई देवी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. दरम्यान या घटनेतून जिल्ह्याच्या गंभीर परिस्थितीचे स्वरूप समोर आले. जनाबाई सारंग घुबडे असं मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावकऱ्यांना शेजारच्या गावामध्ये जावे लागले. गावातून भर पावसामध्ये ही अंत्ययात्रा काढण्यात आली. पार्थिव टेम्पोमध्ये घेऊन शेजारील लिंबारुई देवी या ठिकाणच्या स्मशानभूमीत आणण्यात आलं. अतिवृष्टीने निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीचे हे स्वरूप समोर आले आहे.

Advertisement

नक्की वाचा - Rain Update : Emergency असेल तरच घराबाहेर पडा! राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, तुफान पावसाचे संकेत

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवना नदीची पुरसदृश्य परिस्थिती 

रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शिवना नदीला पूर आला आहे. कन्नड तालुक्यात दोन पुजारी कुटुंबीय अडकली मंदिरात तर गंगापूर लासुर मार्गावर पूल गेला पाण्याखाली आहे. वैजापूर तालुक्यातील झोलेगाव येथे देखील मुसळधार पाऊस झाल्याने शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पैठणच्या जायकवाडी धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला जात आहे. विसर्ग वाढवला जात असल्याने गोदावरी काठच्या नागरिकांना प्रशासनाकडून लाऊड स्पीकर वरून सूचना दिल्या जात आहे. 

दुसरीकडे जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत. यावर्षी तिसऱ्यांदा जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडले आहेत. पाण्याची आवक वाढल्याने जायकवाडी धरणाचे 9 आपत्कालीन दरवाजे देखील उघडण्यात आले आहेत. जायकवाडी धरणातून 94320 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून गोदाकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement
Topics mentioned in this article