Jalna rain news: कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेरलं, प्रश्नांचा भडीमार अन् मंत्र्यांची तारांबळ, अखेर काढता पाय

शेतकऱ्यांना उभारी देण्याचं सगळ्यात पहिलं काम कृषिमंत्र्यांनी करायला हवं.

जाहिरात
Read Time: 3 mins
जालना:

लक्ष्मण सोळुंके

पांढरा शर्ट पांढरी पँट घालून कृषिमंत्री दत्ता भरणे पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहीणी करण्यासाठी बांधावर गेले होते. कृषी मंत्री झाल्यानंतर दत्ता भरणेंना शेतकऱ्यांचा पहिला मोठा प्रश्न होता. तो म्हणजे  कृषिमंत्री,आम्हाला मदत कधी मिळणार. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करायला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे जालन्यातल्या बदनापुरात शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले होते.  कृषिमंत्री दिसताच शेतकऱ्यांनी भरणेंना घेरलं. नुसतं घेरलं नाही. तर यंत्रणेची अक्षरशः लाज काढली. आक्रमक शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. त्यामुळे भरणेंची चांगलीच तारांबळ उडाली. शेवटी कशीतरी त्यांनी या शेतकऱ्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. यावेळी गावकरी चांगलेच आक्रमक झाले होते. ते  म्हणाले आज मंत्री आले म्हणून सगळा लवाजमा आला आहे. एरवी आम्हाला कोण काळं कुत्र विचारत नाही. एक तरुण शेतकरी कृषीमंत्र्यांना चांगलाच भिडला होता. तो म्हणाला सर तुम्ही ऐका, तुम्ही आले म्हणून आज साडे नऊला सगळे हजर आहेत. नाही तर  कुणी येत नाही. सगळं काही चुकीचं होत आहे. आज तुम्ही आले म्हणून शासकीय अधिकारी आले आहेत. कोण विचारतंय शेतकऱ्याला. त्यांना कोणी वाली नाही. 

नक्की वाचा - Marathwada Rain: जीव मुठीत घेवून 13 जण झाडावर, पुरासमोर NDRF ही हतबल, हेलिकॉप्टर मागवलं पण...

शेतकऱ्यांनी भरणेंवर प्रश्नांचा एवढा भडीमार केला की अखेर भरणे त्या बांधावरुन पुढे निघून गेले. पुढच्या बांधावर भरणे पोहोचताच शेतकऱ्यांची तक्रार तिच होती. फक्त बांध वेगळा होता. पंचनामे नीट होत नाहीत. पीकांचं शंभर टक्के नुकसान झालं आहे. यंत्रणा शेतकऱ्यांना निकष आणि नियम दाखवत आहे. शेतकऱ्यांचा रोष पाहता दत्ता भरणेंनी तहसिलदारांना फोन लावला. त्यांनी थेट तहसिलदारांना विचारलं तुम्ही पंचनाम्यामध्ये  ते खरडून जमिनीचं का टाकत नाही. जे जे खरडू गेलं, ते टाकलं पाहिजे ना. त्या ndrf च्या नियमाप्रमाणे अशी विचारणा त्यांनी केला. आता ते तसं टाकून घ्या असे आदेश ही दिले.  पुढे ते म्हणाले मी तुम्हाला मंत्री म्हणून सांगतोय. या बदनापूरला आम्ही आलोय. इथे शेतकऱ्याचा एक गुंठ्याचा जरी पंचनामा राहिला तरी जबाबदार तुम्ही असाल असा दम ही त्यांनी यावेळी दिला.  ज्याचं ज्याचं नुकसान झालंय त्या सगळ्याचे पंचनामे तातडीने करा. खरडून जर असेल खरडून घ्या. पशुधन असेल तर सगळं घ्या. कुठलाही माझा शेतकरी वंचित राहणार नाही याची काळी घ्या. शेतकरी आज खूप अडचणीत आहे हे लक्षात घ्या असं ही त्यांनी तहसिलदारांना सुनावलं. 

पुढचा फोन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लावला. जिल्हाधिकारी फळबागांचा पंचनामा करत नाहीत, अशी शेतकऱ्यांची तक्रार होती. मग कृषिमंत्र्यांनी जिल्हाधिकारी मॅडमना फोन लावला. फोनवर ते म्हणाले मॅडम शेतकऱ्यांनी तुमचं हे पत्रक आणल आहे. तुम्ही असं नका करू. शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे.  मी तुम्हाला एवढं सांगतोय ज्याच नुकसान झालंय त्याचा एक गुंठ्याचाही पंचनामा राहिला नाही पाहिजे असं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं. 

नक्की वाचा - Kalyan News: 7 जणांकडून 5 महिने 1 अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, अश्लील VIDEO व्हायरल

शेतकऱ्यांना उभारी देण्याचं सगळ्यात पहिलं काम कृषिमंत्र्यांनी करायला हवं. तसे भरणे मामा शेतकऱ्याच्या बांधावर तर पोहोचले. अधिकाऱ्यांना फोन करुन झापलंही आणि शेतकऱ्याला मदतीचा शब्दही दिला. तुमचं दुःख आम्ही समजू शकतो असं भरणे यावेळी म्हणाले. शासन तुमच्या जीवावर आहे. निश्चितपणे सगळी मदत मिळेल. सगळी नुकसान भरपाई दिली जाईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे जालन्यापाठोपाठ अहिल्यानगरमध्येही पूरपरिस्थितीची पाहणी करायला पोहोचले. तिथेही मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. आता कृषिमंत्री शब्दाला जागतील आणि कृषिमंत्र्यांनी ज्यांना ज्यांना पंचनामे करण्यासाठी झापलंय तेही मंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे वागतील, अशी अपेक्षा आहे.
 

Advertisement