मोहसीन शेख
मायबाप सरकार वाचवा असं म्हणत गावकऱ्यांनी बचावासाठी सरकार समोर टाहो फोडला आहे. हे चित्र आहे बीड जिल्ह्यातील पिंपळगावचे. यागावाला सिंदफणा या नदीने अक्षरश: वेढा घातला आहे. शिवाय या गावातच एक नैसर्गीक बेट आहे. त्यात शेती आहे. तीथे जवळपास 13 लोक अडकले आहेत. त्यात लहान मुलं, महिला आणि पुरूषांचा समावेश आहे. काल पासून ते तिथं अडकले आहेत. पण त्यांना अजूनही कोणतीही मदत मिळाली नाही. ते मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे त्यांचे नातेवाईक हे चिंतेत आहेत. त्यांना मदत मिळावी यासाठी त्यांनी टाफो फोडला आहे. मदत कधी मिळाणार याचीच प्रतिक्षा ते अजूनही करत आहेत.
बीड जिल्ह्यात पिपळगाव आहे. या गावातून सिंदफणा ही नदी वाहते. इथं होत असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे नदीला महापूर आला आहे. या पूरामुळे पिंपळगावमध्ये 13 लोक शेतात अडकले आहेत. गेल्या दोन दिवसा पासून ही 13 जण शेतात अडकून पडले आहेत. कुणी छतावर तर कुणी झाडावर आश्रय घेतला आहे. जीव मुठीत घेवून हे लोक मदतीची याचना करत आहेत. गावकऱ्यांना ओरडून ओरडून मदतीची मागणी करत आहेत. विशेष म्हणजे या 13 जणांमध्ये लहान मुलांचा ही समावेश आहे. तर काही महिलाही त्यात आहेत.
याघटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारीही घटनास्थळी पोहोचले होते. त्या आधी NDRF ची टीमही गावात पोहोचली होती. पण नदीचा प्रवाहच इतका जबरदस्त होती की एनडीआरएफला ही बचाव कार्य सुरू करता आलं नाही. त्यामुळे त्यांना ही मागे परतावलं लागलं. तर जिल्हाधिकारांनी पाहणी करून ते ही परतले. आम्ही या सर्वांना वाचवून असं आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिली. शिवाय बचावासाठी हेलिकॉप्टर बोलावलं जाईल असं आश्वासनही त्यांनी दिली. पण हेलिकॉप्टरची वाटच पाहाण्याची वेळ गावकऱ्यांवर आली. पुरात अडकलेले फोन करून आम्हाला सुखरूप बाहेर काढा अशी विनंती करत होते.
त्यांचे कुटुंबीय नदीच्या दुसऱ्या काठावर चिंतेत होते. त्यांना अश्रू अनावर होत होते. आमचं पीक गेलं, घरं गेली तरी चालतील पण त्यांचे जीव वाचले पाहीजेत असं ते सांगत होते. प्रशासनाची आम्हाला काही मदत होत नाही. आम्हाला फक्त उडवा उडवीची उत्तर मिळत आहेत असा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. प्रशासनाला आमचे काही पडले आहे की नाही असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने केला. आम्हाला फक्त येड्यात काढलं जात आहे. दोन दिवसा पासून या अडकलेल्या लोकांना अन्न नाही पाणी नाही हे तरी प्रशासनाला समजलं पाहीजे असं त्यांचे नातेवाईक म्हणाले.
या लोकांना वाचवायचं असेल तर हेलिकॉप्टर लवकरात लवकर येणे गरजेचे आहे. नदीच्या मध्येच एक बेट आहे. त्यावर हे लोक अडकले आहेत. पाण्याचा प्रवाह वाढत चालला आहे. शिवाय पाण्याला मोठी गती आहे. त्यामुळे तिथे असलेल्या छपरावर काही जण बसले आहेत. तर काही जण झाडावर जीव मुठीत घेवून आहेत. त्यामुळे कधी हेलिकॉप्टर येणार आणि त्यांचे जीव कधी वाचणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत सर्वांचेच जीव टांगणीला लागले आहे. संपूर्ण मराठवाड्यात सध्या पूरस्थिती पाहायला मिळत आहे. त्याचा सर्वाधिक फटका बीड, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांना बसला आहे.