निलेश बंगाले, प्रतिनिधी
Wardha Farmer : मनात जिद्द असली की कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे दाखवून दिले आहे वर्ध्याच्या आर्वी येथील एका होतकरू युवकाने. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांना नोकरी लागली होती. मात्र छोट्याशा पगाराच्या चौकटीत न राहता स्वतःच शेतीमध्ये नियोजन बद्ध काम करत तो लाखो रुपये कमवत आहे.
तुषार नंदनवार या तरुणाने पारंपरिक शेतीला फाटा देत काहीतरी वेगळं करून दाखवलं आहे.त्याने सततच्या नापिकीला कंटाळून काहीतरी वेगळे करत आपल्या अर्धा एकर शेतीत ड्रॅगन फ्रुट लावत एक अनोखा प्रयोग केला आणि तो यशस्वी सुद्धा करुन दाखवला. आज त्याने 5000 नवीन झाडांची लागवड केली असून येत्या काळात त्याची कमाई लाखोंच्या घरात असणार आहे.
शेतीसोबत आणखी एक व्यवसाय...
इंजिनिअर झाल्यावर तुषार पुण्यात नोकरी करू लागला. पण त्या पगारात तो समाधानी नव्हता. त्यामुळे त्याने पुणं सोडलं आणि गाव गाठलं. वर्ध्यात आल्यानंतर त्याने दाक्षिणात्य खाद्यपदार्थांचा गाडा टाकला. येथे तो इडली, डोसा, मेदू वडा यासारखे दाक्षिणात्य पदार्थ विकतो. या व्यवसायात त्याला मोठं यश मिळालं असून सकाळी अवघ्या तीन तासात तो महिन्याला दीड लाख रुपये कमावतो. घरात आर्थिक उत्पन्न सुरू झाल्यानंतर त्याने शेतीत प्रयोग करायचं ठरवलं.
पारंपरिक पिक घेण्यापेक्षा त्याने ड्रॅगन फ्रूटची शेती लावली. त्याच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे. वडील शेतात राबत असतानाही त्यांना यश येत नसल्याचं त्याने पाहिलं होतं. यासाठी त्याने आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्याने अर्धा एकरात 500 ड्रॅगन फ्रुटची झाडे लावली आणि एकाच वर्षात त्याला चांगला नफा मिळाला. आता त्याने आणखी 5000 झाडे लावली आहेत. यातून मोठं उत्पन्न मिळेल असा विश्वास तुषार नंदनवार या तरुणाने व्यक्त केला.