Mumbai MHADA News: मुंबईसारख्या महानगरात हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी म्हाडाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या २६४० सदनिकांच्या सोडतीतील विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर प्रकल्पातील १२२१ घरांच्या किमतीत ७.५ टक्के कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
म्हाडाकडून सुखद धक्का, घरांच्या किंमती स्वस्त
या निर्णयामुळे घरांच्या किमतीत सुमारे १० ते ११ लाख रुपयांची घट झाली असून, वाढत्या किमतींमुळे अर्ज करण्यास कचरणाऱ्या मध्यमवर्गीयांना म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील दोन प्रमुख प्रकल्पांमधील घरांच्या किमती यापूर्वी दीड कोटींच्या घरात होत्या. सुधारित किमतींनुसार, आता या घरांचे दर १ कोटी ३४ लाखांपासून सुरू होणार आहेत.
तांत्रिक आणि आर्थिक कारणांमुळे घरांच्या विक्रीत अडथळे येऊ नयेत, यासाठी म्हाडाने हा कपातीचा निर्णय घेतल्याचे समजते. विशेष म्हणजे, या प्रकल्पातील प्रत्येक सदनिकाधारकाला एक पार्किंग विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहे, जे मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांच्या दृष्टीने मोठे आकर्षण ठरत आहे. इच्छुक अर्जदारांना १४ मे २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार असून, ५ जून रोजी या घरांच्या लॉटरीची सोडत जाहीर होईल.
अर्जाची मुदत वाढली
दरम्यान, प्रकल्पातील दोन वेगवेगळ्या संकेत क्रमांकांच्या सदनिकांसाठी नवीन दरपत्रक जाहीर करण्यात आले आहेत. संकेत क्रमांक ५३८ (४८० सदनिका): या सदनिकांची मूळ किंमत १ कोटी ४५ लाख ५८ हजार ३०७ ते १ कोटी ४७ लाख ९७ हजार ९९२ रुपये होती. आता नवीन दरानुसार ही घरे १ कोटी ३४ लाख ६६ हजार ४३४ ते १ कोटी ३६ लाख ८८ हजार १४३ रुपयांत उपलब्ध होतील.
संकेत क्रमांक ५३९ (७४१ सदनिका): या घरांची मूळ किंमत १ कोटी ४५ लाख ७४ हजार ९४२ ते १ कोटी ४८ लाख १४ हजार ९०१ रुपये होती. सुधारित दरांनुसार आता ही घरे १ कोटी ३४ लाख ८१ हजार ८२१ ते १ कोटी ३७ लाख ०३ हजार ७८३ रुपयांना मिळतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world