Pune MHADA Lottery News: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या घरांबाबत एक सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाने जाहीर केलेल्या ४,१८६ घरांसाठीची सोडत (लॉटरी) पुन्हा एकदा तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर टाकण्यात आली आहे. या लॉटरीसाठी अर्ज केलेल्या २.१५ लाखाहून अधिक अर्जदारांना आता पुढील तारखेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पुणे म्हाडाची सोडत लांबणीवर!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, म्हाडाच्या पुणे मंडळाने जाहीर केलेल्या ४,१८६ घरांसाठीची सोडत जाहीर केली होती. म्हाडाकडून डिसेंबर महिन्यात जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता प्रशासकीय आणि तांत्रिक स्वरूपाच्या अडचणी कायम असल्याने सोडतीच्या प्रक्रियेत पुन्हा विलंब झाला आहे. ही सोडतीची प्रक्रिया संपूर्णपणे संगणकीय प्रणालीवर आधारित असते.
या प्रणालीमध्ये काही तांत्रिक बिघाड किंवा सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याने लॉटरीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वीदेखील अशाच तांत्रिक कारणांमुळे लॉटरीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आता घरांच्या आशेवर असलेल्या पुणेकरांना पुन्हा एकदा वाट पाहावी लागणार आहे.
नवी तारीख कोणती असेल?
या योजनेमध्ये जवळपास दोन लाख १५ हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. हे सर्व नागरिक सोडतीच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे आता येत्या तीन चार दिवसांमध्ये सोडतीची नवी तारीख जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या लॉटरीमध्ये पुणे मंडळाच्या हद्दीतील पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूर भागातील विविध गृहनिर्माण योजनांमधील एकूण ४,१८६ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
Pune News: बिबट्याची धास्ती; बड्या IT कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन जारी