मेहबूब जमादार, रायगड
रायगडमधील पेण तालुक्यात काही ठिकाणी भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हेटवणे धरणापासून काही अंतरावर असणाऱ्या तिलोर व महागाव परिसरात काल रात्रीपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास पहिला धक्का जाणवला, त्यानंतरही काही सौम्य धक्के जाणवल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हा अनेकांच्या घरातील भांडी पडली, भिंतीवर लटकलेल्या अनेक वस्तू पडल्या. परंतु कोणतेही मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही. याठिकाणी मध्यरात्री तलाठी व अन्य महसूल अधिकाऱ्यांनी भेट दिली व माहिती घेतली. या घटनेमध्ये कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.
(नक्की वाचा- भूकंप आला तर घाबरु नका, ही 5 काम करा ! मुलांनाही समजावून सांगा)
जिल्हा प्रशासन या सदर्भात अलर्ट मोडवर असून अधिक माहिती घेण्याचे काम सुरु आहे. पेण तालुक्यातील तिलोरे तर सुधागड तालुक्यातील महागाव परिसरातील देऊळवाडी, कलाकाराई भोप्याची वाडी, कवेले वाडी, येथे भूगर्भातील आवाज येऊन पहाटे 3 वाजता जमीन हादरली, असा दावा स्थानिकांकडून करण्यात आला. यानंतर सुधागड तालुक्यातील पालीमधील तहसीलदार यांनी पहाटे घटनास्थळी जाऊन या जागेची पाहणी करून येथील ग्रामस्थांची माहिती घेतली.
( नक्की वाचा : Explainer: दिल्लीला वारंवार भूकंपाचा धोका का आहे? काय आहे कारण? )
या धक्क्यात अद्याप कोणतेही नुकसान झाले नसले तरी लोकांना काळजी घेण्याबाबत प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच भूगर्भ तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. पेणचे तलाठी आणि पेण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांनीही या ठिकाणी भेट दिली.