Kolhapur News : कोल्हापुरातील 10 गावातील नागरिक होणार मालामाल; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं आश्वासन

मुंबईत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली चोकक ते अंकली राष्ट्रीय मार्गावरील भुसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळावा यासाठी बैठक झाली.

जाहिरात
Read Time: 3 mins

विशाल पुजारी, कोल्हापूर

Kolhapur News : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोकाक ते उदगाव येथील बाधित शेतकऱ्यांना चौपट मोबदला देण्याचं आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तालुक्यातील गावे आता मालामाल होणार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

गेल्या अनेक दिवसांपासून चोकाक-उदगाव अंकलीपर्यंतच्या दहा गावांतील बाधित शेतकऱ्यांची चौपट भरपाई देण्याची मागणी आहे. मुंबईत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली चोकक ते अंकली राष्ट्रीय मार्गावरील भुसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळावा यासाठी बैठक झाली. खासदार धैर्यशील माने यांच्यासह आरोग्यमंत्री व पालकमंत्री प्रकाश अबिटकर इतरही आमदार उपस्थित होते  या बैठकीत चौपट मोबदला देण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली. शिवाय महामार्ग प्राधिकरण व जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी सकारात्मक प्रस्ताव राज्य सरकारकडे तातडीने पाठवण्याचा आदेश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

मुंबईत झालेल्या बैठकीत खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अशोकराव माने यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर कोल्हापूर जिल्ह्यातील या महामार्गतील बाधित शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी त्यांनी मांडलेल्या मुद्द्यानुसार या महामार्गासाठी इतर भागातील शेतकऱ्यांना जमिनीच्या चौपट दराने मोबदला मिळत असताना, 10 गावांतील शेतकऱ्यांना दुप्पट दर मिळणार असल्याने शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलन करीत आहेत. ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळोवेळी मांडली आहे. शिवाय, चौपट मोबदल्याची मागणीही केली असल्याचे सांगितले. 

बाधित शेतकऱ्यांची गावे कोणती

शिरोळ आणि हातकणंगले या दोन तालुक्यातील चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, हातकणंगले, मजले, तमदलगे, निमशिरगाव, जैनापूर, उमळवाड, उदगाव, अंकली अशी बाधित 11 गावांची नावे आहेत. कोल्हापूर ते सांगली मार्गावर ही गावे आहेत. या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गात जाणार आहेत. आता या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याचं आश्वासन महसूलमंत्री बावनकुळे यांनी केलं आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : Karuna Sharma : 'मला प्रेमात पाडण्यासाठी 20 कोटींची ऑफर, मुलीला उचलून...' करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप )

वाढीव मोबदल्यासाठी अनेकदा आंदोलने

बाधित गावांनी अनेकदा या महामार्गतील भुसंपादन प्रक्रियेत वाढीव मोबदला मिळावा यासाठी मागणी केलेली. या गावांना चौपट भरपाई मिळावी, उदगाव बायपास महामार्गावरून होणारा प्रस्तावित मार्ग करावा, यासाठी राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी आमरण उपोषण करून, आंदोलन केलेले होते. तसेच सांगली कोल्हापूर महामार्ग रोखून धरत तीव्र भूमिका देखील ठेवलेली.. या आंदोलनानंतरच प्रशासनाला जाग आली असं म्हटल तर वेगळं ठरणार नाही.. अनेक आंदोलनानंतर बुधवारी लोकप्रतिनिधीची महसूलमंत्री यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत आता सकारात्मक निर्णय झाला आहे.

(नक्की वाचा-  Chandrapur News: खाकीतली माणूसकी! 15 दिवसाच्या बाळाला 'तिच्या' एका कृतीने जीवनदान)

शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण

महामार्गाच्या कामासाठी 33 कि.मी. अंतरातील जमिनी संपादित केल्या जात होत्या. मात्र यावेळी शेतकऱ्यांनी याला विरोध केला. आता मुंबईत झालेल्या बैठीकत हा मोबदला वाढवून देण्याविषयी चर्चा झाली आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे, तसेच महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्हीसीद्वारे माहिती दिली. त्यावर महसूलमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना चौपट भरपाई मिळवून देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण निर्माण होईल अशी लोकप्रतिनिधीची अपेक्षा आहे.

Advertisement
Topics mentioned in this article