Mumbai Cyber Fraud: मीरा रोड येथील एका ६८ वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करताना तांत्रिक त्रुटीचा फटका बसला आणि त्यातून झालेल्या सायबर फसवणुकीत त्यांना तब्बल ६ लाख ७,९३२ रुपये गमवावे लागले आहेत. या गंभीर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक तिकीट पडले ६ लाखांना...
मिळालेल्या माहितीनुसार, काशिमीरा येथील डेल्टा गूड्स सोसायटीमध्ये राहणारे इंद्रकुमार जेटली हे आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावरून क्रेडिट कार्डद्वारे तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करत होते. तांत्रिक कारणामुळे त्यांचे २,०५६ रुपये कापले गेले, मात्र तिकीट आरक्षित झाले नाही. हे पैसे परत मिळवण्यासाठी त्यांनी गुगलवर सर्च करून एका तथाकथित 'कस्टमर केअर' क्रमांकावर संपर्क साधला.
समोरील भामट्याने जेटली यांचा विश्वास संपादन करून त्यांना एक संशयास्पद ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडले. हे ॲप इन्स्टॉल करताच मोबाईलचा ताबा सायबर चोरट्याकडे गेला. त्यानंतर आरोपीने जेटली यांच्या बँक खात्यातून तब्बल ६ लाख रुपयांहून अधिक रक्कम परस्पर काढून घेतली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जेटली यांनी पोलिसांत धाव घेतली.
दरम्यान, या धक्कादायक प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सायबर गुन्हेगार नवनवीन क्लुप्त्या वापरून नागरिकांना लुटत आहेत, त्यामुळे अनोळखी लिंकवर क्लिक करणे किंवा ॲप डाऊनलोड करणे किती घातक ठरू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. पोलीस आता सायबर भामट्यांचा तांत्रिक तपास करत आहेत.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील 'या' रेल्वे मार्गावर 21 दिवसांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काही गाड्यांचे मार्ग बदलले
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world