Mira Road Jodhpur Sweets Closed: वर्षभरापूर्वी मिरा रोड येथे मराठीवरुन झालेल्या वादाचे केंद्र ठरलेले जोधपूर स्वीट हे दुकान अखेर बंद झाले आहे. वर्षभरापूर्वी या दुकानाच्या कर्मचाऱ्यांनी मराठी बोलण्यास नकार दिल्याच्या वादातून मनसे पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झाली होती. या राड्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील मिरा रोड येथे जाहीर सभा घेत मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला होता. आता या दुकानाला अखेर टाळे लागले असल्याचा दावा मनसे कडून करण्यात आला आहे.
मराठीशी पंगा, आता दुकानाला टाळा
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मराठी भाषेचा अवमान आणि त्यानंतर उसळलेला राजकीय वाद यामुळे चर्चेत आलेले मिरा रोड येथील 'जोधपूर स्वीट' हे दुकान अखेर बंद झाले आहे. वर्षभरापूर्वी मराठीत बोलण्यावरून झालेल्या राड्यामुळे हे दुकान राज्यभर चर्चेत आले होते. मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर या दुकानाच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता, ज्याचा शेवट आता दुकान बंद होण्यात झाला असल्याचा दावा मनसेकडून करण्यात येत आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंदोत्सव सुरू असताना, मनसे पदाधिकारी या दुकानात गेले होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्यास नकार दिल्याने वाद उफाळला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेनंतर राज ठाकरे यांनी स्वतः मिरा रोडमध्ये जाहीर सभा घेऊन 'मराठीचा अपमान सहन करणार नाही' असा इशारा दिला होता.
या वादानंतर स्थानिक ग्राहकांनी फिरवलेली पाठ आणि सातत्याने झालेला व्यावसायिक तोटा यामुळे दुकानदारावर ही वेळ आल्याचे बोलले जात आहे. सध्या या दुकानाला टाळे लागल्याने मनसे कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले असून, 'मराठीची ताकद' दाखवून दिल्याचा संदेश यानिमित्ताने दिला जात आहे.