जाहिरात

Pune News : पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प; पीडित चिमुरडीचा मृतदेह आंदोलनस्थळी, नसरापूर प्रकरणात नागरिकांचा आक्रोश

आरोपीला फाशीची शिक्षा दिली जावी यासाठी चिमुरडीच्या कुटुंबासह शेकडो नागरिकांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर रस्ता रोको आंदोलन पुकारलं आहे.

Pune News : पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प; पीडित चिमुरडीचा मृतदेह आंदोलनस्थळी, नसरापूर प्रकरणात नागरिकांचा आक्रोश

Pune News : पुणे जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 65 वर्षांच्या नराधमाने अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर नागरिकांकडून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गवर नागरिकांचं आंदोलन...

आरोपीला फाशीची शिक्षा दिली जावी यासाठी चिमुरडीच्या कुटुंबासह शेकडो नागरिकांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर रस्ता रोको आंदोलन पुकारलं आहे. परिणामी पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या दोन तासांपासून साताऱ्याला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. याशिवाय साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. नसरापूर येथील घटना घडून २४ तास उलटून गेले तरीही बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षांनी याबाबत काहीच कारवाई नसल्यामुळे नागरिकांमध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे. गेल्या दोन तासांपासून पुणे-बंगळुरू मार्ग ठप्प आहे. कधीपर्यंत ही वाहतूक कोंडी सुटेल याबाबत सांगता येऊ शकत नाही. जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा दिली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची आंदोलकांची भूमिका आहे. अद्यापही ४ वर्षांच्या पीडित चिमुरडीवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाही. ही चिमुरडी आंदोलनाच्या ठिकाणी एका रुग्णवाहिकेत असल्याची माहिती आहे. 

वाहनांच्या लांब रांगा...

नवले पुलापासून ते थेट बाणेर-सुतारवाडीपर्यंत वाहनांच्या जवळपास १५ ते २० किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. भररस्त्यात नागरिक आक्रमक झाल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. नसरापूर गावातील एका ४ वर्षांच्या चिमुकलीवर ६५ वर्षांच्या आरोपीने अत्याचार करून तिची हत्या केली. या अमानवीय कृत्यामुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत आरोपीला कठोर शासन मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका पीडितेच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी घेतली आहे.

चिमुरडीवर बलात्कार अन् हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, ही 4 वर्षांची चिमुरडी सुट्ट्या घालवण्यासाठी पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये आजीच्या घरी आली होती. दुपारी घराबाहेर खेळत असताना 65 वर्षांच्या नराधमाने तिला फूस लावून जनावरांच्या गोठ्यात नेलं. तिथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर या नराधमाने तिची ओळख पटू नये म्हणून डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. एवढ्यावरच न थांबता त्याने या मुलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. मुलगी बराच वेळ दिसत नसल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पुणे पोलिसांकडून वाहतुकीची नियमावली....

२ मे रोजी सायंकाळी ७ वाजेपासून वडगाव पुल येथे हॉटेल सुवर्णा समोर सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे मुंबईकडून साताऱ्याकडे तसेच साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही वाहतूक मार्गिका (लेन) पूर्णतः बंद करण्यात आलेल्या आहेत. म्हणून, सदर मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी वडगाव ब्रिजकडे येणे टाळावे. कृपया सुरक्षित ठिकाणी थांबून राहावे किंवा पर्यायी मार्गांचा वापर करावा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com