प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी
काही वेळा आपली जवळची व्यक्ती इतकी आजारी असते की ती आता जगण्यासाठी काही तरी चमत्कार घडावं असं आपल्याला वाटू लागतं. असाच एक चमत्कार नंदुरबार जिल्ह्यातल्या दोन महिन्याच्या मुलीबाबत घडला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील मीनाबाई सचिन पावरा ह्या होळी निमित्तानं त्यांच्या माहेरी सूर्यपूरमध्ये आल्या होत्या. तिथं त्यांच्या सोनाली या दोन महिन्याच्या मुलीला उलट्याचा त्रास झाला. घरी परतल्यानंतर खूप रडल्यानं सोनाली शांत झाली. त्यामुळे घाबरलेल्या तिच्या कुटुंबीयांनी तेलखेडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वैद्यकीय अधिकारी डॉ गणेश तडवी रुग्णवाहीकेसह या बाळाच्या घरी दाखल झाले.बाळाला तपासले असता त्यांची ह्रदयाची गती मंद होती. हातपाय गार पडलेले होते. बाळाला अँप्नीया झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बाळाच्या पायावर टिचक्या मारल्या आणि बाळाने मोठा श्वास घेतल्याने सर्वांच्या जीवात जीव आला, अशी माहिती बाळाच्या नातेवाईकांनी दिली आहे.
बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्यानं जळगावमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. त्यावेळी बाळाची प्रकृती खूप नाजूक होती. त्याची त्याची प्रकृती पाहून घरातील लोकांनी जगण्याची आशा सोडली होती. पण, डॉक्टरांचे योग्य उपचार आणि त्यांनी टिचकी मारल्यामुळे बाळानं हलचाल केली आणि तो जगेल अशी आशा आम्हाला निर्माण झाली. त्यानंतर आम्ही त्याला शहदामधील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार करत आहेत, अशी माहिती बाळाचे नातेवाईक अनिल पावरा यांनी दिलं.
( नक्की वाचा : Ladki Bahin Scheme : किती बहिणींना झाला फायदा, सरकारचे किती पैसे खर्च? पहिल्यांदाच आकडा उघड! )
सोनाली आमच्या हॉस्पिटलमध्ये आली त्यावेळी तिला श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. तिचं वजन देखील वयानुसार खूप कमी होतं. त्यामुळे किडनीवर दाब येऊन किडनीचं काम कमी होऊन क्षाराचं प्रमाण वाढलं होतं. सोडियम आणि पोटॅशियमचं संतुलन बिघडलं होतं. त्यामुळे ते बाळ आमच्याकडे भरती झालं त्यावेळी ती खूप सुस्त होती.
आता तीन दिवसांमध्ये त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहेत, अशी माहिती शहादामधील बालरोग तज्ज्ञ डॉ. मालविका कुलकर्णी यांनी दिली.
( स्पष्टीकरण : बाळाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहिती या बातमीत देण्यात आली आहे. NDTV नेटवर्क याची कोणतीही जबाबदारी घेत नाही.)