Women's toilet issues : महाराष्ट्रातील कोणत्याही महामार्गावरुन लांबचा प्रवास करीत असताना कोणत्याही महिलेसाठी सर्वात मोठी अडचण ठरते ती स्वच्छता गृहाची. महाराष्ट्रातील कोणत्याही भागात अगदी महामार्गापासून स्थानिक रस्त्यावरही स्वच्छ शौचालयं मिळत नाही. त्यामुळे महिलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. अनेकदा अस्वच्छ स्वच्छतागृहामुळे आजाराचाही धोका असतो. आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा मुद्दा विधान परिषदेत मांडला. मंत्र्यांनी एकदा तरी पेट्रोल पंपावरील महिला शौचालयांचा सर्व्हे करावा म्हणजे वास्तव त्यांच्या लक्षात येईल, असं म्हणत त्यांनी सद्यपरिस्थितीत महिला शौचालयांच्या परिस्थितीवर संताप व्यक्त केला. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी उत्तर दिलं आणि महाराष्ट्रातील स्वच्छता गृह सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवेंद्रराजे भोसले म्हणाले ही, महामार्गावर 25 किलोमीटरच्या अंतरावर एक शौचालय उभं करण्यात येणार आहे. सुलभ शौचालयासारख्या एनजीओला याबाबत माहिती दिली जाईल. याची जबाबदारी बचत गटाकडे दिली जाणार आहे. येथेच त्यांना एक दुकानही दिलं जाणार आहे. यामुळे शौचालयांच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिलं जाऊ शकतं, असं मंत्री भोसले यावेळी म्हणाले. याशिवाय महिला अधिकाऱ्यांकडून 15 दिवसातून एकदा जाऊन तपासणी करण्याच्या सूचनाही स्थानिक पोलिसांना दिल्याचं त्यांनी सांगितलं.
नक्की वाचा - Nagpur Violence : नागपुरात दंगलीचा 'काश्मीर पॅटर्न', ATS करणार चौकशी
चित्रा वाघांनी सुचवले पर्याय...
महाराष्ट्रात मॉल बाहेरुन चकाचक दिसतात मात्र प्रत्यक्षात स्वच्छता गृहांची अवस्था भीषण असते. महामार्गावरील पेट्रोल पंपावरील शौचालयांची तर दुरावस्था आहे. येथील नळ तोडलेले असतात, मुद्दाम काचा फोडून ठेवल्या जात असल्याचं चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत सांगितलं. विधान परिषदेत बोलताना चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रातील स्वच्छतागृह अधिक चांगल्या राहाव्यात यासाठी काही पर्याय सुचवले आहेत. मुंबईत 1820 महिलांमागे एक शौचालय आहे. वस्तीतील शौचालय पे-अँड युजवर असतात. ही शौचालयं स्थानिक मंडळांना चालवायला दिल्या जातात. मात्र यासाठी जास्त खर्च पडतो. व्यावसायिक किमतीने वीज आणि पाणी दिलं जातं. त्यामुळे येथील वीजेसाठीचे दर सवलतीत दिले जावेत.