Rohit Pawar Vs Chandrakant Bawankule: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वृत्तपत्रातील निनावी जाहिरातीवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या जाहिरातीवरुन आमदार रोहित पवार विरुद्ध महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये सामना रंगला आहे. रोहित पवार यांनी बावनकुळेंवर निशाणा साधताना तुम्ही महसूलमंत्री म्हणून ज्या कंपनीचा ९० कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता, त्या कंपनींने जाहिरात दिली का? असा सवाल केला होता. यावर बावनकुळे यांनी पुरावे दाखवा असं आव्हान केले होते. या आव्हानालाही रोहित पवार यांनी जोरदार पलटवार केला आहे.
काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?
"श्री. रोहित पवार जी, फारच मोठ्ठा शोध लावला तुम्ही.!! महसूलमंत्री म्हणून मी कोणत्या कंपनीला ९० कोटींचा दंड माफ केला, हा आरोप सिद्ध करा. अन्यथा, राजकीय संन्यास घ्या. करा सिद्ध !!" असे म्हणत थेट आव्हान दिले होते. या आव्हानाला आता रोहित पवार यांनीही जोरदार प्रत्यूत्तर देत मी पुराव्याशिवाय बोलत नाही, हा घ्या पुरावा म्हणत थेट सभागृहात मांडलेल्या प्रश्नाचा दाखलाच दिला आहे.
पवार कोणत्या चौकात स्वतःला उलटे लटकवून घेणार आहेत? उबाठाचा सवाल
रोहित पवार यांचा पलटवार..
"आदरणीय बावनकुळे साहेब, मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही. हा घ्या पुरावा. तुमच्याच पक्षाचे आमदार मा.बबनराव लोणीकर यांनी 11 जुलै 2025 रोजी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला तुम्ही स्वतः महसूल मंत्री म्हणून उत्तर दिले आहे. दिलेले उत्तर आणि प्रश्न तुम्हीच बघा, तुम्ही केवळ दंडच माफ केला नाही तर जप्त केलेले साहित्यदेखील परत करण्याचे आदेश दिले होते हे विसरलात का?" असे म्हणत रोहित पवार यांनी बावनकुळेंवर निशाणा साधला आहे.
तसेच" एकंदरीतच यावरून असे दिसून येते की, गावातील लोक जेव्हा पाणंद रस्ते किंवा गावातील रस्ते यासाठी मुरूम काढतात तेंव्हा तुम्ही त्यांच्यावर कारवाई करता पण दुसरीकडे धनदांडग्यांनी अवैध उत्खनन केलं असतानाही कोट्यवधींचा दंड माफ करता. हेच का तुमचं सर्वसामान्यांचं सरकार? राहिला प्रश्न राजकीय संन्यासाचा तर आम्ही तुम्हाला राजकीय संन्यास घ्या म्हणत नाही फक्त जनतेच्या प्रश्नाचे उत्तर द्या. आहे का हिंमत?" असा सवालही रोहित पवार यांनी केला आहे.
नक्की वाचा - Exclusive: 'ही महाराष्ट्राची संस्कृती नाही!', अजित पवारांच्या 'त्या' गैरवर्तनावर माजी DGP संतापले, पाहा Video