जाहिरात

Ajit Pawar Anjana Krishna Row: पवार कोणत्या चौकात स्वतःला उलटे लटकवून घेणार आहेत? उबाठाचा सवाल

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूर ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) अंजना कृष्णा यांच्यातील कथित वादावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

Ajit Pawar Anjana Krishna Row: पवार कोणत्या चौकात स्वतःला उलटे लटकवून घेणार आहेत? उबाठाचा सवाल
IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील कथित वादावरून अजित पवारांवर टीका

Criticism of Ajit Pawar from the editorial of Saamana : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar News) आणि सोलापूर ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) अंजना कृष्णा यांच्यातील कथित वादावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवारांनी फोन करुन अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास थांबवण्यास सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेच्या उबाठा गटाकडून टीका करण्यात आली आहे. भ्रष्टाचार खतम करायला निघालेल्या पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्र्यांच्या धमकी प्रकरणावर आता निदान स्वतःचे तरी कान उपटून घ्यावेत, असंही या अग्रलेखात म्हटलं आहे.

सामनाच्या अग्रलेखात काय लिहिलंय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांना जो धमक्या वगैरे देण्याचा प्रकार केला तो प. बंगाल, तेलंगणा, कर्नाटक, झारखंड, हिमाचल प्रदेश अशा राज्यांत घडला असता तर भाजपवाल्यांनी ‘‘कायदा-सुव्यवस्था कोसळली हो'' म्हणून छाती बडवण्याचा जाहीर कार्यक्रम रस्त्यावर केला असता, पण महाराष्ट्रात सगळं कसं शांत शांत! जणू अजित पवारांकडून त्या पोलीस अधिकाऱ्यास धमक्या दिलेल्या नाहीत, तर दूरध्वनीवरून गायत्री मंत्राचाच जप घडला. भ्रष्टाचार खतम करायला निघालेल्या पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्र्यांच्या धमकी प्रकरणावर आता निदान स्वतःचे तरी कान उपटून घ्यावेत!

महाराष्ट्रातील प्रशासकीय व्यवस्था एकेकाळी देशात सर्वोत्तम होती. केंद्रीय लोकसेवा आयोगातून उत्तीर्ण झालेले अधिकारी महाराष्ट्रात काम करण्याची संधी मिळावी यासाठी धडपडत असत. मंत्री उगाच प्रशासनात हस्तक्षेप करीत नव्हते व आपल्या हस्तकांची बेकायदेशीर कामे करा, असा दबाव अधिकाऱ्यांवर आणत नव्हते. याचे कारण राज्याचे नेतृत्व करणारे लोकही तितकेच तालेवार होते. आता महाराष्ट्राचे चित्र बदलले आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ‘वर्षा' बंगल्यावर धुऊन काढण्याची भाषा केली. हे जसे योग्य नाही, तशी मंत्र्यांची अधिकाऱ्यांना होत असलेली दमबाजीदेखील योग्य नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत सर्वच नेत्यांनी संयमी भाषा वापरणे गरजेचे आहे. त्याच वेळी मंत्र्यांनीही अधिकाऱ्यांना धमक्या देऊन बेकायदेशीर कामे पुढे रेटणे बंद केले पाहिजे.

महाराष्ट्रात याबाबतीत कमालीचे अराजक निर्माण झाले आहे. कोणी कोणाचे ऐकत नाही व जो तो नियम, कायदे धाब्यावर बसवून कारभार हाकू इच्छितो. करड्या शिस्तीचे भोत्ते म्हणून ज्यांच्या कर्तबगारीचे नगारे वाजवले जातात, त्या अजित पवार यांनी बेकायदेशीर ‘खाण' उद्योगास संरक्षण देण्यासाठी करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षकांना उघड धमकी दिल्याच्या प्रकरणाने राज्याच्या अब्रूचे तीनतेरा वाजले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावचे हे प्रकरण आहे. येथे बेकायदेशीर पद्धतीने मुरूम उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध जनतेच्या तक्रारी येताच करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांनी या चोरट्यांविरुद्ध कारवाई सुरू केली. हे चोरटे मंडळ अजित पवार पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांनी आयपीएस अंजना कृष्णा यांच्या विरोधात थेट अजित पवारांकडे तक्रार केली व पवारांना फोन लावून अंजना कृष्णा यांच्याकडे दिला.

 नक्की वाचा - Exclusive: 'ही महाराष्ट्राची संस्कृती नाही!', अजित पवारांच्या 'त्या' गैरवर्तनावर माजी DGP संतापले, पाहा Video

अंजना कृष्णा व अजित पवार यांच्यात या वेळी जी शाब्दिक चकमक उडाली ती महत्त्वाची आहे. ‘‘आमच्या लोकांवरील कारवाई थांबवा, नाहीतर मी तुमच्यावर अ‍ॅक्शन घेईन,'' अशी सरळ धमकीच पवारांनी दिली. ‘‘मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. तुम्ही मला ओळखत नाही काय?'' असे अजित पवार म्हणाले. मुळात ज्या बाबा जगताप या चोरट्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केली त्याच चोरट्याच्या फोनवरून अजित पवार आयपीएस अधिकाऱ्यांना धमकावतात व आपल्या पक्षाच्या गुन्हेगार कार्यकर्त्यांना संरक्षण द्या, असे सांगतात. याची दखल केंद्रीय गृहमंत्र्यांनी व देशाच्या कॅबिनेट सचिवांनी घेतली पाहिजे. पवार हे स्वतःला शिस्तबद्ध वगैरे मानतात, पण त्यांनी बेशिस्त कामातून हजारो कोटींची संपत्ती जमा केली व आपल्या इतर सहकाऱ्यांनाही तसे करण्यास उत्तेजन दिले. त्यांच्या 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावर स्वतः पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रहार केले आहेत. तरीही अजित पवार हे त्याच मोदी कृपेने फडणवीस मंत्रिमंडळात जाऊन बसले आहेत. पवार हे अधूनमधून शिस्तीच्या नावाने गुरगुरत असतात. ‘‘बेशिस्त व बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना टायरमध्ये उलटे लटकवून मारू,'' अशा सूचना आणि मार्गदर्शन अजित पवार यांनी अलीकडेच केले, पण माढाच्या मुरूम सर्व बेकायदेशीर कामे सार्वजनिक उपक्रमात मोडत असल्याचा ‘जीआर' काढून टाका.

Anjana Krishna: थेट अजित पवारांशी पंगा! कोण आहेत महिला IPS अधिकारी अंजना कृष्णा, काय आहे पार्श्वभूमी?

नक्की वाचा - Anjana Krishna: थेट अजित पवारांशी पंगा! कोण आहेत महिला IPS अधिकारी अंजना कृष्णा, काय आहे पार्श्वभूमी?

महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे रान मोकळेच आहे, पण भ्रष्टाचाराला कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्रीच धमक्या देतात. आता समजले की, या प्रकरणाचा गाजावाजा झाल्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल अजितदादांच्या ‘त्या' हस्तकावर गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हा तर अजित पवारांवरही दाखल व्हायला हवा. सरकारी कामात हस्तक्षेप आणून बेकायदेशीर काम करून देण्यासाठी त्यांनी आयपीएस अधिकाऱ्याला धमकावले. कायदा सगळ्यांसाठी समान वगैरे असेल तर मंत्र्यांवरही त्याच कायद्याने गुन्हा दाखल व्हायला हवा. अर्थात महाराष्ट्रात कायद्याचे राज्य खरोखर आहे काय? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांना जो धमक्या वगैरे देण्याचा प्रकार केला तो प. बंगाल, तेलंगणा, कर्नाटक, झारखंड, हिमाचल प्रदेश अशा राज्यांत घडला असता तर भाजपवाल्यांनी ‘‘कायदा-सुव्यवस्था कोसळली हो'' म्हणून छाती बडवण्याचा जाहीर कार्यक्रम रस्त्यावर केला असता, पण महाराष्ट्रात सगळं कसं शांत शांत! जणू अजित पवारांकडून त्या पोलीस अधिकाऱ्यास धमक्या दिलेल्या नाहीत, तर दूरध्वनीवरून गायत्री मंत्राचाच जप घडला. रा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com