शिर्डी: विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरु झालं आहे. निवडणुकीत 41 आमदार निवडून आलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत परतीचे वारे वाहत असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मात्र गळती सुरु झाली आहे. अशातच आजपासून सुरु होत असलेल्या शिर्डी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवार गटाच्या दोन बड्या नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डीमध्ये दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले असून आजपासून या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि राज्यभरातील राष्ट्रवादीचे नेते, मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवारांना दोन मोठे धक्के बसलेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज शिर्डीमधील अधिवेशनाला हजेरी लावली आहे. ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीआधी सतीश चव्हाण यांनी अजित पवार यांची साथ सोडत शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेतली होती. यावेळी त्यांनी विधानपरिषदेची आमदारकी रद्द करण्यासंबंधी पत्रही पाठवले होते.
सतीश चव्हाण यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. मात्र आता हे निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला असून ते पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.
(नक्की वाचा- Saif Ali khan Attack : ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा सैफवर झालेल्या हल्ल्याशी संबंध नाही, पोलिसांचं स्पष्टीकरण)
दुसरीकडे, विधानपरिषदेचे माजी सभापती आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शरद पवारांना साथ देणारे रामराजे नाईक निंबाळकर यांनीही शिर्डीच्या अधिवेशनाला हजेरी लावली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रामराजे निंबाळकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात भूमिका घेतली होती. तसेच आमदार दिपक चव्हाण यांनीही शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता.
मात्र या निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण विधानसभेत दिपक चव्हाण यांचा पराभव झाला. ज्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या शिर्डी अधिवेशनाला त्यांनी हजेरी लावली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाला हजेरी लावली. प्रकृती अस्वस्थामुळे छगन भुजबळ शिबिराला उपस्थित राहणार नव्हते मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा विनंतीला मान देऊन भुजबळांनी अधिवेशनाला हजेरी लावली आहे.