शिवसेनेत केलेल्या बंडानंतर एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापण्यात आल्याने ते अस्वस्थ होते. त्यांनी माध्यमांश बोलताना आपली भावना व्यक्त केली होती. त्यांच्या पत्नीने श्रीनिवास वनगा (MLA Srinivasa Vanaga missing) हे आत्महत्येची भाषा करीत असल्याचंही सांगितलं होतं. दरम्यान ते गेल्या १२ तासांपासून नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारल्याने नाराज असून ते अचानक घरातून निघून गेल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. वनगा यांनी प्रसारमाध्यमांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर वनगा हे घरातून निघून गेले आहेत. याबाबत आमदार श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं, तिकीट कापल्यामुळे श्रीनिवास वनगा नैराश्यात होते. ते आयुष्य संपवण्याची भाषा करीत होते. आपण उद्धव ठाकरेंना धोका दिल्याचंही ते म्हणाल्याचं श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीने सांगितलं.
नक्की वाचा - कर्जत-जामखेडमध्ये भूमिपूत्र विरुद्ध बाहेरील उमेदवाराचा मुद्दा; राम शिंदे विरुद्ध रोहित पवारांमध्ये रंगणार लढत
पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापण्यात आलं आणि त्यांचं तिकीट राजेंद्र गावित यांना देण्यात आलंय. ही यादी बाहेर आल्यानंतर कुणालाही न सांगते ते घराबाहेर पडल्याची माहिती आहे. तरी पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेत आहेत.