मुंबई: राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून येत्या दोन दिवसात प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. प्रचारासाठी शेवटचे काही दिवस बाकी असल्याने महायुती, महाविकास आघाडीसह सर्वच नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र आज नियोजित सभांमध्ये काहीच न बोलता अवघ्या काही मिनिटांमध्येच कार्यक्रम आटोपल्याने त्यांना ऐकण्यासाठी आलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच निराशा झाली. नेमकं काय घडलं वाचा सविस्तर.
गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे, मुंबईसह नाशिकमध्ये प्रचारसभांचा धडाका लावला आहे. दरदिवशी राज ठाकरे मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. आज राज ठाकरे यांच्या भिवंडी ग्रामीण विधानसभेचे उमेदवार श्री. वनिता कथोरे, कल्याण पश्चिम विधानसभेचे उमेदवार श्री.उल्हास भोईर, कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटील तसेच उल्हासनगर विधानसभेचे उमेदवार श्री. भगवान भालेराव यांच्या प्रचारासाठी जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते.
नक्की वाचा: 'राणेंना दोन मुलं आहेत, तिसरा असता तर त्याला...' सुषमा अंधारेंनी डिवचलं
परंतु प्रकृती ठीक नसल्याने राज ठाकरे यांनी लांबलचक भाषण न करता जाहीर सभेसाठी आलेल्या मनसैनिकांशी संवाद साधला. तसेच यापुढच्या सभांमध्येही भाषण करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सततच्या सभा, मुलाखतींमुळे माझी तब्येत ठीक नाही मी फक्त तुमचे दर्शन घ्यायला आलो आहे. वणवण फिरणं, बडबड करणं काहीवेळा अंगलट येतं, असे म्हणत राज ठाकरे यांनी सभा आटोपत्या घेतल्या.
दरम्यान, २० तारखेला तुम्ही गाफील राहू नका.मनसेच्या उमेदवारांना मतदान करा. पुन्हा तुमच्या भेटीला नक्की येईल, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. महत्वाचं म्हणजे १७ तारखेला शिवाजी पार्क मैदानावर मनसेची सभा होणार आहे. आता राज ठाकरे यांची प्रकृती बिघडल्यामुळे ही सभा होणार का?याबाबतही आता सवाल उपस्थित होत आहे.
महत्वाची बातमी: माझी अब्रू तुमच्या हातात, डोंगर झाडीचे नाव घालवू नका', शहाजी बापूंची भावनिक साद