Raj Thackeray Reaction On BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेतील ठाकरेंच्या 40 वर्षांच्या सत्तेला धक्का देत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाने सत्ता मिळवली. मुंबईमध्ये ठाकरे बंधु एकत्र आल्याने महायुतीसमोर मोठे आव्हान होते, मात्र महायुतीच्या लाटेत ठाकरेंची जादू फिकी पडली. या निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला अवघ्या सहा जागा जिंकता आल्या. मुंबईच्या या धक्कादायक निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणालेत राज ठाकरे?
"सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे,"
"महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की," असं म्हणत राज ठाकरेंनी मनसैनिकांचे कौतुक केले केले.
काय चुकलं, काय राहून गेलं?
तसेच "आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच," असंही ते म्हणालेत.
तसेच "तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया," असं आवाहनही त्यांनी केले आहे.
Maharashtra Election 2026: महापालिका निवडणुकीत कुणी काय कमावलं? कुणी काय गमावलं? वाचा ठळक मुद्दे