Marathwada water issue : केंद्र सरकारची ‘हर घर जल' ही महत्वाकांक्षी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘जलजीवन मिशन' अंतर्गत राबवली जात आहे. राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तर धरणं पन्नास टक्क्यांहून अधिक भरलं आहे. मात्र जुलै महिना उजाडला तरी मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. परिणामी येथील नागरिकांनी पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. बीडमधील (Beed News) गावकऱ्यांची पाण्याची गरज भागवण्यासाठी ‘हर घर जल' ही योजना राबवली जात आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात या योजनेची पुरेशी अंमलबजावणी झालेली नाही. अनेक गावांमध्ये अद्याप पाण्याचा थेंबसुद्धा पोहोचलेला नाही. या पार्श्वभूमीवर मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी 'कोंबड्या' घेऊन पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन (MNS leader's Protest) करत शासन आणि प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे.
अधिकारी चिरीमिरी घेतल्याशिवाय कोणतंही काम करत नाहीत. त्यामुळेच आम्ही आज त्यांना पार्टीसाठी कोंबड्या भेट देत आहोत. त्यांनी कोंबड्या घ्याव्यात, पण जलजीवन योजनेतला भ्रष्टाचार थांबवून गावागावात पाणी पोहोचवावं अशी मागणी दरेकर यांनी केली आहे. या अनोख्या आंदोलनाची चर्चा परिसरात चांगलीच रंगली आहे.