Monsoon 2026 Forecast: यंदाचा पावसाळा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य जनतेसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, सन 2026 मध्ये मान्सूनचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे पॅसिफिक महासागरात निर्माण झालेली एल निनोची स्थिती.
या नैसर्गिक बदलामुळे पावसाच्या वितरणावर मोठा परिणाम होणार असून, जुलै महिन्यापासून पावसात मोठा खंड पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः शेती आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून आतापासूनच नियोजनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
मान्सूनचे लवकर आगमन पण...
यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी किंवा वेळेवर होण्याची चिन्हे आहेत. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होऊ शकतो. मात्र, सुरुवातीचा उत्साह टिकण्याची शक्यता कमी आहे.
जून महिना संपल्यानंतर, म्हणजे जुलैपासून पावसाचा जोर ओसरू लागेल. अनेक भागांत पावसाचा मोठा खंड पडू शकतो, ज्यामुळे पेरण्या संकटात येण्याची शक्यता आहे. खाजगी हवामान तज्ज्ञ अथ्रेय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा पावसाचे एकूण प्रमाण सरासरीच्या केवळ 96% राहण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा : CIDCO Lottery: मर्सिडीजमधून येणाऱ्याला गरिबांचे घर? सिडकोच्या अजब नियमावर हायकोर्टाचा चाबूक! 26 हजार घरं... )
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात दुष्काळ?
यंदाच्या पावसाळ्यात महाराष्ट्रातील काही विभागांना पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसू शकतो. यामध्ये विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अत्यंत कमी राहण्याचा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची ओढ कायम राहू शकते. यामुळे पिकांचे नुकसान होण्यासोबतच धरणांमधील पाणीसाठा आटण्याची आणि उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चक्रीवादळाचा धोका आणि हवामानातील बदल
मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे मान्सूनच्या सुरुवातीच्या प्रवासाला गती मिळू शकते, मात्र एल निनोच्या प्रभावामुळे हा जोर कायम राहणार नाही. एल निनोची स्थिती जून 2026 पर्यंत कायम राहणार असल्याने मान्सूनच्या उत्तरार्धात म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही पावसाची अनिश्चितता कायम असेल.
( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीतील प्रसिद्ध शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाकडून शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी;शहरात संताप )
शेती आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम
पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. वेळेवर पाऊस न पडल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. तसेच, पावसातील खंडामुळे भूगर्भातील पाणीपातळीवरही परिणाम होईल. धरणे पूर्ण क्षमतेने न भरल्यास पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. या सर्व परिस्थितीचा थेट परिणाम राज्याच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world