राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांत एकूण 4,136 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असून त्यामध्ये मुस्लीमधर्मीय उमेदवारांची संख्या 420 आहे. यामध्ये अपक्ष व नोंदणीकृत पक्षांच्या उमेदवारांची संख्या मोठी असून महाविकास आघाडीने 11 तर महायुतीने सहा मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. यंदा बहुजन समाज पक्षाकडून सर्वाधिक 237 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत मुस्लीम मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याशिवाय पाच पक्षांनी 100 हून अधिक उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत. यात भाजप, बहुजन समाज पक्ष, अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांचा समावेश आहे.
नक्की वाचा - "देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील सर्वात खोटं बोलणारं व्यक्तिमत्त्व", रोहित पवारांची टोकाची टीका
निवडणूक आयोगाने आगामी विधानसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, यंदा एकूण चार हजार १३६ उमेदवारांचे अर्ज सादर करण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक अर्ज अपक्ष उमेदवारांनी भरले आहेत. हा आकडा २८०६ इतका आहे. या यादीत एकूण 158 राजकीय पक्षांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मुस्लीम संघटनांनी महाविकास आघाडीकडे मुस्लिमांना १० टक्के उमेदवारी देण्याची मागणी केली होती. प्रत्यक्षात काँग्रेसने 8, राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) २ आणि शिवसेनेने (उद्धव ठाकरे) 1 असे एकूण 11 (4 टक्के) उमेदवार दिले. महायुतीमध्ये शिवसेनेने (एकनाथ शिंदे) 1 आणि राष्ट्रवादीने (अजित पवार) 5 असे अवघे सहा (2 टक्के) मुस्लीम उमेदवार दिले आहेत. भाजपने नेहमीप्रमाणे एकही मुस्लीम उमेदवार दिलेला नाही.
नक्की वाचा - राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या निवडणूक ड्यूटीमुळे शासनाचा मोठा निर्णय
वंचित बहुजन आघाडी 200 जागा लढवत असून 23 मुस्लीम उमेदवार उभे केले आहेत. ‘एमआयएम'ने 17 पैकी 10 तर समाजवादी पक्षाने 9 पैकी 7 मुस्लीम उमेदवार दिले आहेत. नोंदणीकृत राजकीय पक्षांचे 150 आणि अपक्ष 218 मुस्लीम उमेदवार विधानसभेच्या मैदानात आहेत. त्यामध्ये 8 महिला उमेदवारांचा समावेश आहे. ‘औरंगाबाद पूर्व' मतदारसंघात सर्वाधिक 17 तर ‘मालेगाव मध्य' विधानसभा मतदारसंघात सर्वच्या सर्व 13 उमेदवार मुस्लीम आहेत. मुदत संपलेल्या विधानसभेत 10 मुस्लीम आमदार होते. विधान परिषदेत राष्ट्रवादीचे (अजित पवार) इद्रीस नायकवडी हे एकमेव मुस्लीम आमदार आहेत.'
अपक्ष नशीब आजमावणार..
यंदा निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 2806 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहे. इतर पक्षांच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे.