दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानास्पद विधाने, बेताल वक्तव्ये करण्याचे जणू सत्रच सुरु आहे. अभिनेता राहुल सोलापूरकरने छत्रपतींचा अपमान केल्यानंतर प्रशांत कोरटकरने शिवरायांबाबत बेताल वक्तव्ये केली होती. याबाबतच आता खासदार उदयनराजे भोसले भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली असून अमित शहा यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
काय आहे उदयनराजे भोसलेंची पोस्ट?
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्म समभावाचा विचार देत स्वराज्याची स्थापना केली. राज्यकारभारात रयतेच्या सहभागाव्दारे लोकशाहीचा पाया रचला. परंतु काही विकृत मनोवृत्तीचे लोक गलिच्छपध्दतीने त्यांचा तसेच छत्रपती संभाजीमहाराज आणि राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांचा अवमान होईल असे भाष्य, टिपणी किंवा कृती करतात. यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळुन,समाजामध्ये दुफळी पसरते.
अश्या प्रवृत्तींची जीभ छाटण्याची किंवा चौरंग करण्याची धमक आमच्यासह शिवप्रेमींमध्ये निश्चित आहे परंतु आम्ही संयम राखुन आहोत. केंद्र व राज्यशासनाने अश्या प्रवृत्तींना धडकी भरवणारा मकोका/ टाडा सारखा अजामिनपात्र आणि 10 वर्षे सश्रम कारावासाची व जबर दंडाची शिक्षा असलेला विशेष कायदा पारित करावा अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे नांव घेण्याचा आपल्याला कोणालाच अधिकार राहणार नाही.
देशाचे गृहमंत्री ना. अमित शहा यांची आज दिल्ली येथे भेट घेवून, विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत तसेच दिलेल्या निवेदनात नमुद केले की, राज्यशासनाने तज्ज्ञांशी विचारविमर्श करुन, ऐतिहासिक दस्तावेजांचा योग्य अर्थ लावून, यापूर्वीच शिवछत्रपतींसह मराठा साम्राज्याचा शासनमान्य साधार इतिहास प्रसिध्द करणे गरजेचे होते. आज विकृत प्रवृत्ती असलेली व्यक्ती, त्याला जसे समजले, वाटते आहे अश्या पध्दतीने इतिहासातील प्रसंगाचे वर्णन करुन अकारण विवाद निर्माण करतो.
ऐतिहासिक घटनांचे चित्रपट, दूरदर्शन मालिका, वेबसिरिज, डॉक्युमेंटरीज यांचे चित्रिकरणापूर्वी सेन्सॉर बोर्डाला सहाय्यभुत असलेली, इतिहासकार, संशोधक आणि इतिहासतज्ज्ञांचा समावेश असलेली कमिटी स्थापन करावी, कमिटीच्या शिफारशी विचारात घेवून सेन्सॉरशिप देण्यात यावी जेणेकरुन सभाव्य विरोधाभास टाळण्याचे आणि समाजस्वास्थ अबाधित राखणे शक्य होईल अशी सूचना देखिल यावेळी केली.
सपूर्ण जगासाठी प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याची प्रचिती देणारे राष्ट्रीय स्मारक नवी दिल्ली येथे उभारणे गरजेचे आहे. तसेच छत्रपती शिवाजीमहाराज यांचे वडील, स्वराज्याचे संकल्पक, शहाजीराजे भोसले यांची समाधी कर्नाटक राज्यात आहे. शहाजीराजेंची समाधी दुर्लक्षित आणि अविकसित राहाणे हे न पटणारे आहे. यावेळी समवेत, श्री. काका धुमाळ, ॲड . विनित पाटील, श्री. कुलदिप क्षिरसागर, करण यादव, उपस्थित होते.