मंगेश जोशी, जळगाव
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत केवळ तीन गुण कमी मिळाल्याने तरुणाने टोकाचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथील 25 वर्षीय तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. आकाश भीमराव बारी असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आकाश मागील काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. याआधी देखील त्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्या होत्या. मात्र त्याला अपयश आलं होतं. मात्र आकाशने खचून न जाता पुन्हा परीक्षेची तयारी करत मंत्रालय क्लार्क पदासाठीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल 16 मे रोजी लागला. या परीक्षेत आकाशला केवळ तीन गुणांनी यशाने हुलकावणी दिली. याच कारणाने आकाशने टोकाचे पाऊल उचललं.
(नक्की वाचा- अकोल्यात ट्रक आणि कारचा विचित्र अपघात, ट्रक उलटला तर कार पुलावर हवेत लटकली)
आकाशचा मोठा भाऊ सूरज हा जळगावमध्येच एका कंपनीत कामाला आहे. सूरज कंपनीतून घरी आल्यानंतर आकाश गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याला दिसून आला. सदर प्रकार उघडकीस येताच ग्रामस्थांच्या मदतीने आकाशला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
(नक्की वाचा- भाविकांनी भरलेल्या बसमध्ये अग्नितांडव, 8 जणांचा होरपळून मृत्यू; 24 हून अधिक जखमी)
आकाश अत्यंत हुशार मुलगा होता. मात्र थोड्याशा अपयशामुळे आकाशने टोकाची भूमिका घेतल्याने शिरसोली गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. आकाशच्या कुटुंबात त्याची आई, मोठा भाऊ व वहिनी असा परिवार आहे. मोठ्या भावाचं याच महिन्यात लग्न झाल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र आकाशच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.