MSRTC ST Bus Job Recruitment 2026: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात लवकरच मोठी मेगाभरती होणार आहे. एसटी महामंडळामध्ये 17 हजार 742 पदांची मेगा भरती करण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची घोषणा केली आहे. एसटी महामंडळ अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी दरवर्षी पाच हजार नवीन बस खरेदी करण्याचे धोरण राबवले जात आहे. या नव्या बस सेवेसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी नवीन कर्मचाऱ्यांची भरतीही कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळात मेगा भरती
आर्थिक संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) बळकटी देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या ताफ्यात वाढणाऱ्या बसेसच्या तुलनेत मनुष्यबळाची भासणारी कमतरता दूर करण्यासाठी लवकरच १७ हजार ७४२ पदांची जंगी भरती केली जाणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केली. या निर्णयामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
कुणाला मिळणार प्राधान्य?
एसटी महामंडळाची सेवा अधिक विस्तारण्यासाठी आणि प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया अनिवार्य झाली आहे. परिवहन विभागाने या भरतीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला असून, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. विशेष म्हणजे, २०२२ च्या ऐतिहासिक संपादरम्यान एसटीची चाके धावती ठेवण्यासाठी ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली, त्यांना या भरती प्रक्रियेत विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याकडे सरकारचा कल असल्याचे दिसून येत आहे.
महामंडळाच्या बस ताफ्यात सध्या लक्षणीय वाढ होत आहे. संपाच्या काळात केवळ १२,५०० बसेस असलेल्या एसटीकडे आता १४,००० हून अधिक बसेस आहेत. त्यातच दरवर्षी ५,००० नवीन बसेस घेण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. ८,००० बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ३,००० बसेसचे टप्प्याटप्प्याने आगमन होत आहे. ही वाढती संख्या पाहता चालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची गरज ओळखून ही 'मेगा भरती' युद्धपातळीवर राबवण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.
Crime News: 'ती बाई..' किर्तनात वादग्रस्त विधान, निवृत्ती महाराजांवर हल्ला, घरात घुसून मारहाण