Palghar News : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय मार्गावर कुटुंबाचा भीषण अंत; मृतदेहाच्या चिंधड्या उडाल्या, भयानक दृश्य

हा अपघात इतका भीषण होता की, प्रवाशांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रस्त्यावर पडले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

Palghar News : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ढेकाळे येथील वाघोबा खिंड परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, प्रवाशांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रस्त्यावर पडले होते. या मृतांमध्ये दुचाकीवरील पती-पत्नी आणि एक मुलाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. 

अपघात करुन चालक फरार...

मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू असून मनोर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मनोर ग्रामीण रुग्णालयात हलवले आहेत. अपघात ग्रस्त दुचाकी हिरो होंडा कंपनीची CBZ गाडी असून MHO4 DF 5433 असा वाहन क्रमांक आहे. दरम्यान, अपघात करून फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

नक्की वाचा - Petrol-Diesel Price Update: इंधन दरवाढीचा 'प्रीमियम' फटका! औद्योगिक डिझेलच्या किमती भडकल्या; जाणून घ्या नवे दर

वसईजवळ आणखी एक अपघात...

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसई तालुक्याच्या हद्दीत एकापाठोपाठ एक सहा वाहने एकमेकांना धडकल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावेळी एका टेम्पोमध्ये चालक पूर्णपणे अडकून पडला होता, त्याला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. ससुपाडा परिसरात काँक्रीटचे काम सुरू असताना हा अपघात घडला. यामध्ये दोन कार, एक बस, टेम्पो, कंटेनर आणि एका पिकअप व्हॅनचा समावेश आहे. या सहाही वाहनांची धडक इतकी जोरात होती की वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, टेम्पोमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिक नागरिक आणि वसई वाहतूक पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.