मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही पक्षांमधील जागावाटप नेमके कसे असणार हे अद्याप जाहीर करण्यात आले नसले तरी सोमवारी संध्याकाळपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेने 125 जणांना उमेदवारी अर्ज दिले होते. बंडखोरी टाळण्यासाठी आणि नाराजांची मातोश्रीबाहेर गर्दी होऊ नये यासाठी ज्यांची उमेदवारीसाठी निवड करण्यात आली आहे, अशांना मातोश्रीवर बोलावून फॉर्म देण्यात येत होते. सोमवारचा दिवस यामुळे शांततेत गेला खरा मात्र मंगळवारी ठाकरेंच्या शिवसेनेतील नाराज शिवसैनिकांचे जत्थेच्या जत्थे मातोश्रीवर धडकण्यास सुरूवात झाली. यावेळी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मनातील सल पहिल्यांदाच जाहीरपणे बोलून दाखवली. 'उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी गद्दारी केली' असं म्हणत ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्यांना उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा तसेच आमदार आदित्य ठाकरे यांनी गद्दार म्हणून डिवचण्यास सुरूवात केली होती. आजही एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या नेत्यांना ठाकरे पितापुत्र गद्दार म्हणूनच बोलावतात. त्याच ठाकरेंना त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते आमच्याशी गद्दारी केल्याचे म्हणू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.
नक्की वाचा: BMC Election Shivsena UBT Candidate List: ठाकरेंच्या शिवसेनेचे 60 उमेदवार जाहीर, 5 अल्पसंख्यांकांनाही संधी
आम्ही फक्त झेंडे लावायचे काम करायचे का ?
मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना प्रभाग क्रमांक 202 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच पवन जाधव याला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरला होता, त्यासाठी त्यांना सोमवारी मातोश्रीत ठिय्या मांडून बसावे लागले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देऊ केली. त्यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या भागातील शिवसैनिक प्रचंड संतापले आहेत. एका शाखाप्रमुखाने म्हटले की, "मी सामान्य शिवसैनिक आहे, 36 वर्ष काम करतोय. आम्ही फक्त झेंडे लावायचे काम करायचे का ? श्रद्धा जाधव शाखेचे इलेक्ट्रिसिटीचे बिल भरत नाही. मेन्टेनंस भरत नाही, शाखेत येत नाही. शाखा विकून खाल्ली त्यांनी. सगळे निगेटीव्ह रिपोर्ट दिले, तरीही त्यांना तिकीट का दिले ? स्वत:ला तिकीट, नवऱ्याला तिकीट मुलाला तिकीट, सासऱ्याला तिकीट मग आम्ही जायचं कुठे ?
आम्ही कष्ट करतो म्हणून शिवसेना जिंकते, महिला शिवसैनिक स्पष्टच बोलली
याच वॉर्डातील एका महिला शिवसैनिकाने म्हटले की, "7 वेळा याच बाईला उमेदवारी देतात, आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत; आमचे आयुष्य गेलं शिवसेनेसाठी. आम्ही शिवसेनेसाठी डोकी फोडतो, आमचा जीव जळतो. आमच्यासोबत गद्दारी केली. आमचा शाखाप्रमुख इतके दिवस काम करतो, पण उद्धव ठाकरे नेहमी श्रद्धा जाधव यांचंच ऐकतात, मग आम्ही आहोत तरी कोण तुमच्या नजरेत ? आम्ही कोणीच नाही. आम्ही पाय जळवतो तेव्हाच शिवसेना उमेदवार जिंकतो. हे उद्धव साहेबांना कळत नाही? तुमच्यासाठी श्रद्धा जाधव मोठी आहे, मग आम्ही काय चिंधी आहे का ?
नक्की वाचा: BMC Election 2026: 'मराठी माणसा जागा हो...' ठाकरे गटात नाराजीनाट्य, आयात उमेदवाराला तिकीट दिल्याने संताप
पैसे बुडवल्याचा महिला शिवसैनिकाचा आरोप
अन्य एका महिला शिवसैनिकाने गंभीर आरोप केले, तिने म्हटले की, "2017 साली श्रद्धा जाधव निवडून आल्या, महिलांना साड्या वाटल्या. त्याचे 3 लाख अजून दिले नाही. दागिने गहाण ठेवून मी त्या साड्या विकत घेतल्या होत्या. त्या बाईने मला अजून पैसे दिले नाहीत. गरीब माणसाचे पैसे द्यायला काय होतात. मी रस्त्यावर बसून वडापाव विकते. काम करणाऱ्या माणसाने काय करायचे ?"