Mumbai Local News: लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अन् मोठी बातमी समोर आली आहे. लोकलसेवा जलद करण्यासाठी रेल्वे बोर्डाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कुर्ला ते सीएसएमटी या सर्वाधिक गर्दीच्या आणि तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या पट्ट्यातील ताण कमी करण्यासाठी चार लांब पल्ल्याच्या गाड्यांचे टर्मिनल आता लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे हलवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
चार एक्सप्रेस गाड्यांचे स्टेशन बदलले..
मध्य रेल्वेवरील कुर्ला ते सीएसएमटी हा टप्पा रेल्वे जाळ्यातील सर्वात 'सॅच्युरेटेड' म्हणजेच क्षमतेपेक्षा जास्त वापरला जाणारा मार्ग मानला जातो. या मार्गावर लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या एकाच मार्गिकेचा वापर करत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी जर एखादी लांब पल्ल्याची गाडी उशिराने येत असेल, तर त्याचा थेट परिणाम लोकलच्या वेळापत्रकावर होतो. ही समस्या सोडवण्यासाठी रेल्वेने गाड्यांच्या टर्मिनलमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
Davos WEF 2026: आता तिसरी मुंबई..! दावोसमधून सर्वात मोठी घोषणा; रायगड जिल्ह्यासाठी मोठं गिफ्ट
बदलण्यात आलेल्या गाड्या
रेल्वे बोर्डाच्या निर्णयानुसार, २२६२९ दादर-तिरुनेलवेली, १६३३१ सीएसएमटी-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस, १६३५१ सीएसएमटी-नागरकोईल (पूर्व) आणि १६३३९ सीएसएमटी-नागरकोईल (पश्चिम) या चार गाड्या आता सीएसएमटी किंवा दादरऐवजी एलटीटीवरून मार्गस्थ होतील.
दरम्यान, या बदलामुळे शहर भागात येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या कमी होईल, ज्यामुळे लोकल गाड्यांसाठी अधिक 'पाथ' उपलब्ध होतील. जेव्हा रेल्वे व्यवस्था एखाद्या तांत्रिक बिघाडातून सावरत असते, तेव्हा अशा बदलांमुळे लोकल गाड्या पुन्हा रुळावर आणणे सोपे जाते. या निर्णयामुळे भविष्यात मध्य रेल्वेची सेवा अधिक गतिमान आणि वक्तशीर होईल, अशी अपेक्षा रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
Mumbai Mayor: ...तर ठाकरे गटाला लागणार महापौरपदाची 'लॉटरी'? कसं? वाचा सविस्तर