मुंबई कोस्टल रोडसाठी ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार? काय आहे कारण

मुंबई कोस्टल रोड पूर्णपणे सेवेत येण्यासाठी प्रवाशांना आणखी पाच महिन्यांची  प्रतीक्षा करावी लागणार आहे. काय आहे कारण?

Advertisement
Read Time: 3 mins

मुंबई कोस्टल रोड पूर्णपणे सेवेत येण्यासाठी प्रवाशांना आणखी पाच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचा संपूर्ण कोस्टल रोड सुरू होण्यास ऑक्टोबर महिना उजाडणार असल्याचे म्हटले जात आहे. वरळीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम, सुशोभिकरण आणि काही प्रमाणात डांबरीकरणाचे काम पूर्ण होण्यासाठी ऑक्टोबरपर्यंतचा वेळ लागण्याचा अंदाज आहे.   

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कोस्टल रोडच्या अधिकाऱ्यांकडून जानेवारी 2024 मध्ये कोस्टल रोड संपूर्णपणे सेवेत येण्यासाठी मे  2024ची डेडलाइन दिली गेली होती. पण मे महिना संपत आलेला असतानाही कोस्टल रोडचे काम केवळ 89 टक्केच पूर्ण झालं आहे आणि 11 टक्के काम पूर्ण होणे बाकी असल्याचे म्हटले जात आहे. 

(नक्की वाचा: प्रवाशांनो हे लक्षात ठेवा! मध्य रेल्वेवर 3 दिवसांचा मेगाब्लॉक, लोकलच्या 930 फेऱ्या रद्द)

रिपोर्ट्सनुसार, यामध्ये हाजी अली मार्ग ते वरळीकडे जाणाऱ्या मार्गाचेही काम पूर्ण न झाल्याने मान्सूनदरम्यान डांबरीकरणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्हपासून ते उत्तरेकडे जाणारा मार्ग 10 जूननंतर सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. 

(नक्की वाचा : मुंबईत आजपासून 5 टक्के पाणी कपात लागू, या धरणातील पाणीसाठा शून्य)

बोगद्यातील गळतीची पाहणी करण्यासाठी आलेले असताना त्यांनी ही माहिती दिली होती. डिसेंबर 2018पासून कोस्टल रोडच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. यादरम्यान कोस्टल रोडसाठी (Mumbai Coastal Road) वर्ष 2022पर्यतची मुदत देण्यात आली होती. पण अद्याप बरेच काम बाकी असल्याने नवीन मुदतीमध्ये तरी संपूर्ण कोस्टल रोड बांधून तयार होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Advertisement

बोगद्यामध्ये होतेय गळती

दुसरीकडे मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोस्टल रोडवरून (Coastal Road Tunnel) राज्य सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. तीन महिन्यांपूर्वीच मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाची एक बाजू प्रवाशांसाठी खुली करण्यात आली होती आणि केवळ तीन महिन्यांतच या मार्गाच्या बोगद्यामध्ये गळती होऊ लागलीय. यातच मुंबईमध्ये 10 जून ते 11 जूनदरम्यान मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत मुंबई कोस्टल रोड पावसाळ्यामध्ये प्रवाशांकरिता कितपत सुरक्षित आहे? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

(नक्की वाचा: मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी बरसणार?)

नेमकी काय आहे समस्या? 

मुंबई कोस्टल रोडच्या (Mumbai Coastal Road) बोगद्यामध्ये भिंतींतून पाणी झिरपत असल्याची बाब काही दिवसांपूर्वी निदर्शनास आली आहे. 300 मीटर लांबीच्या अंतरामध्ये पाच ठिकाणी पाणी झिरपत असल्याची माहिती आहे. पाणी झिरपत असल्याने तीन सांध्यामध्ये ओलसरपणाही दिसतोय. जोडणीच्या दोन सांध्यांमध्ये टाकण्यात आलेले सिलिंगच्या सोल्युशनमध्ये (केमिकल) अंतर निर्माण झाल्याने पाणी गळती होत असावी, असे निदर्शन प्रथमदर्शनी नोंदवण्यात आले आहे. 

Advertisement

गळतीवर करण्यात आली ही उपाययोजना

मुंबई कोस्टल रोडच्या (Mumbai Coastal Road) बोगद्यातील जोडणी सांध्यांमध्ये इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राऊट सोडण्यात आले आहे. त्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी पाणी झिरपणे थांबले आहे. सिमेंट कॉक्रिटमध्ये असलेली पोकळी भरून काढण्यासाठी या पॉलिमर ग्राऊटमुळे मदत मिळते. या गळतीमुळे बोगद्याचे बांधकाम, दर्जा किंवा वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे म्हटले जात आहे.