Mumbai Coastal Road : मरीन ड्राइव्ह ते वांद्रे अवघ्या 15 मिनिटात; कोस्टल रोडबद्दल 10 महत्त्वाच्या गोष्टी

मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उद्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचं आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उद्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या कोस्टल रोडच्या नव्या मार्गिकेमुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास केवळ 15 मिनिटांत करता येणार आहे. मुंबई कोस्टल रोड दररोज सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाहनांसाठी खुला असेल. कोस्टल रोड, वरळी-वांद्रे सी लिंक मार्गे पश्चिम द्रुतगती महामार्ग अर्थात वेस्टर्न हायवेवरुन मुंबईकरांना मरिन ड्राइव्ह ते दहिसरपर्यंत सिग्नल फ्री प्रवास करता येणार असल्याने हे फायदेशीर ठरेल.

1. वांद्रे वरळी सी लिंक (बीडब्ल्यूएसएल) ते मरीन ड्राइव्ह ला जोडणारा  मुंबई कोस्टल रोड (एमसीआरपी) सोमवारपासून सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार आहे. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ आणि लोटस जंक्शन या भागांना जोडणाऱ्या तीन इंटरचेंजचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, डिसेंबर 2025 पर्यंत प्रोमेनेड आणि तीन भूमिगत पार्किंगसुविधांचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

2. यापूर्वी दक्षिण मुंबईतील प्रवाशांना वांद्रे वरळी सी लिंक (बीडब्ल्यूएसएल) मार्गे उत्तरेकडे प्रवास करावा लागत होता, वरळीतील खान अब्दुल गफ्फार खान मार्गावर उतरावे लागत होते आणि त्यानंतर कोस्टल रोडवर जावे लागत होते.

3. कोस्टल रोड कनेक्टरचा दक्षिणेकडील भाग पूर्ण झाल्याने प्रवाशांना आता सी लिंकवरून थेट मरीन ड्राइव्हकडे जाता येणार असून उत्तरेकडून दक्षिणेकडे अखंड प्रवास करता येणार आहे.

Advertisement

4. कोस्टल रोडचे उद्घाटन करण्यात येत असून त्याचा भाग 827 मीटरचा असून त्यात समुद्रावरील 699 मीटर आणि अॅप्रोच रोडसाठी 128 मीटरचा समावेश आहे. हा पूल बांधण्यासाठी सुमारे 2400 मेट्रिक टन बो आर्क स्ट्रिंग गर्डर बसविण्यात आल होते. गर्डर 143 मीटर लांब, 27 मीटर रुंद आणि 31 मीटर उंच आहे.

Advertisement

नक्की वाचा - Mumbai Coastal Road: तारीख ठरली! कोस्टल रोड- वरळी वांद्रे सी लिंकला जोडणारा पुल वाहतुकीसाठी खुला होणार

5. मुंबई किनारा मार्गावरील वाहतूकीबाबत बदल धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्गावरील (कोस्टल रोड) नव्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या होत असताना पोलिसांनीही तेथील वाहतुकीत बदल केले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी याबाबतचे आदेश शनिवारी जारी केले.

6. कोस्टल रोडच्या उत्तर वाहिनी मार्गावर मरिन ड्राईव्ह (प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज) / वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली जंक्शन) / लाला लजपतराय कॉलेज / बिंदूमाधव ठाकरे जंक्शन मार्गे वांद्रे टोल प्लाझाकडे जाणारी वाहतूक, तसेच वरळी कोळीवाडा – प्रभादेवीकडे जाणारी उत्तर वाहिनी सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यत सुरू राहील आणि रात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील.

Advertisement

7. वांद्रे टोल प्लाझाकडून कोस्टल रोड कनेक्टर पुलाद्वारे मरिन ड्राईव्ह (प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज) / वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली जंक्शन) जाणारी दक्षिण वाहिनी सकाळी 7 पासून रात्री 12 पर्यंत सुरू राहील. तसेच बिंदूमाधव ठाकरे जंक्शनकडून सी लिंक गेटद्वारा वांद्रे टोल प्लाझाकडे जाणारी उत्तर वाहिनी सकाळी 7 पासून रात्री 12 पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील.

8. हा बदल 27 जानेवारीपासून सकाळी 7 पासून पुढील निर्णय येईपर्यंत अंमलात राहणार आहे. कोस्टल रोड कनेक्टर पूल 80 किमी, वळणाच्या ठिकाणी ४० किमी व कोस्ट रोड उतरणीवर 30 किमी वेग मर्यांदेचे निर्बंध घालण्यात आले आहे. याबाबतचे आदेश वाहतूक पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत.

9. एमसीआरपीअंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते वरळी या 4.35 किलोमीटर म्हणजेच 4.83 हेक्टर क्षेत्रावरील मिडियनचे सुशोभीकरण मेसर्स टाटा सन्स लिमिटेडतर्फे करण्यात येणार आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) फंडातून या सुशोभीकरणासाठी निधी दिला जाणार आहे.

10. या सुशोभीकरणाचे उद्घाटन 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाने होणार आहे. ब्रीच कँडी येथील प्रियदर्शनी पार्क ते सी लिंकच्या वरळी टोकापर्यंतचा साडेसात किलोमीटरचा कोस्टल रोडचा उर्वरित भाग मे महिन्यापर्यंत तयार होणे अपेक्षित आहे.