शिंदेंनी ठाकरेंना डिवचले, थेट मातोश्रीसमोरच बॅनर झळकवले; एकच चर्चा

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजपला नऊ, शिवसेना शिंदे गटाला सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) एका जागेवर विजय मिळाला आहे. यानुसार महायुतीने महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी केवळ 17 जागा जिंकल्या आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार

शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचे काम केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवासस्थान मातोश्रीजवळ असलेल्या महामार्गावर शिंदे गटाने बॅनरबाजी केली आहे. महामार्गावर नरेंद्र मोदी यांच्या (Narendr Modi) शपथविधी सोहळ्याशी संबंधित पोस्टर लावण्यात आले आहे. 'फिर एक बार मोदी सरकार, राजतिलक की करो तैयारी...एक अकेला सब पर भारी!' असा मजकूर पोस्टरवर झळकावण्यात आला आहे.  

कोणी लावले पोस्टर?

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांनी हे पोस्टर मातोश्रीबाहेर लावले आहे. काही दिवसांपूर्वी नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचे पोस्टरही मातोश्री बंगल्याबाहेर लावण्यात आले होते. पोस्टरमध्ये त्यांचे वर्णन कोकणचा राजा असे करण्यात आले आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीने 48 जागांपैकी 30 जागा जिंकल्या आहेत.

9 जूनला शपथविधी 

नरेंद्र मोदी 9 जून रोजी संध्याकाळी 7.15 वाजता सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यानिमित्ताने राष्ट्रपती भवनामध्ये जोरदार तयारी सुरू आहे. राष्ट्रपती 9 जून रोजी पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. यानिमित्ताने नरेंद्र मोदी 3.0 सरकारचे पोस्टर देशभरात झळकत आहेत.

Modi 3.0 | 'हा' एक चेहरा आहे नवीन, महाराष्ट्रातून 'या' मंत्र्यांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ?