राकेश गुडेकर, प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्याची आज सकाळ सुरू झाली ती एका दुःखद बातमीने. वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाणाऱ्या मुलीसह अन्य चार जणांना काळाने रस्त्यातच गाठलं. मिताली मोरे या आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी माहेरी येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे 5 ते 5.30 सुमारास मुंबईहुन देवरुख येथे जाणाऱ्या सेव्हन सीटर कारचा भीषण अपघात झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावरून ही सेव्हन सीटर कार थेट दोन पुलांच्या मधून जगबुडी नदीपात्रात कोसळली आणि या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हे कुटुंब मुंबई मीरा रोड येथून देवरुख येथे अंत्यसंस्कारासाठी चाललं होतं. यामध्ये कार चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसही लगेचच दाखल झाले. माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आणि बचावकार्य सुरू झालं.
नक्की वाचा - Crime News: 21 वर्षीय विद्यार्थ्याचा रेल्वे रुळावर मृतदेह, आत्महत्या की घातपात? कुटुंबियांचे गंभीर आरोप
या अपघातामध्ये मेधा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर, मिताली विवेक मोरे, निहार विवेक मोरे, श्रेयस राजेंद्र सावंत या पाच जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे यामध्ये दोन कुटुंबातील व्यक्तींचा समावेश आहे. हे कुटुंब देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघालं होतं, त्याचवेळेला निष्ठुर नियतीने डाव साधला आहे.
या अपघातात गंभीर जखमी झालेले परमेश पराडकर यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय हलवण्यात आलं आहे, तर विवेक मोरे हे गंभीरित्या जखमी झाले आहेत. त्यांनाही खेड येथून पुढील उपचार करता हलवण्यात आलं आहे. किया कार (क्रमांक MH 02 3265) ही कार घेऊन मुंबई मीरा रोड इथून गावी निघाले होते. येथील पराडकर कुटुंबीय नालासोपारा परिसरात राहणारे आहेत तर मोरे मीरा-भाईंदर येथील आहेत.